The unique 'Malegaon pattern' of all-party involvement for development | विकासाकरिता सर्वपक्षीय सामीलकीचा अनोखा ‘मालेगाव पॅटर्न’
विकासाकरिता सर्वपक्षीय सामीलकीचा अनोखा ‘मालेगाव पॅटर्न’

ठळक मुद्देमहापौरपद निवडणुकीत काँग्रेस-शिवसेनेच्या आघाडीला भाजपचाही पाठिंबामिळून सारे सत्तेत !

सारांश


राज्यातील सत्तेची समीकरणे जुळवताना काँग्रेस व शिवसेना हे दोन्ही भिन्न विचारसरणीचे पक्ष आज एकत्र आले असले तरी, नाशिक जिल्हा परिषदेतील सत्तेप्रमाणे मालेगाव महापालिकेतही गेल्या अडीच वर्षांपासून त्यांचे सहचर होतेच; त्यामुळे पुढील अडीचकीच्या कार्यकाळासाठीही ते पुन्हा सोबत येणे अपेक्षितच होते, अनपेक्षित ठरले ते इतकेच की, सद्य राजकीय स्थितीत शिवसेना व भाजपचे संबंध ताणले गेलेले असतानाही मालेगावात मात्र भाजपने काँग्रेस-शिवसेना आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. विकासाची कवाडे उघडी करून घेण्याची या पक्षाच्या स्थानिक नेत्यांची यातील स्वयंप्रज्ञा महत्त्वाची ठरावी.

मालेगाव महापालिकेतील पदाधिकारी निवडीसाठी काँग्रेस, शिवसेना व भाजपने एकत्र येत सत्तेचा नवा ‘मालेगाव पॅटर्न’ आकारास आणला आहे. तेथे काँग्रेसच्या ताहेरा शेख महापौरपदी, तर शिवसेनेचे नीलेश आहेर उपमहापौरपदी निवडून आले आहेत. भाजपच्या नगरसेवकांनी काँग्रेस व सेनेच्या उमेदवारांना मतदान केल्याने या निवडी सहजसुलभ झाल्या. गेल्या अडीच वर्षात काँग्रेस व शिवसेना सोबत होतेच; परंतु भाजप विरोधात होता. त्यामुळे या पक्षाच्या नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामे मार्गी लावण्याच्या उद्देशाने यंदा भाजपही सत्ताधाऱ्यांसोबत गेला. विशेष म्हणजे, शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेमुळे भाजपस राज्यातील सत्तेपासून दूर राहावे लागले आहे. त्यातून या उभय पक्षांत काहीशी तणावाची स्थिती असताना त्याची चिंता न करता मालेगावात मात्र भाजपने वेगळा निर्णय घेतला़ निवडणुकांमध्ये केले गेलेले पक्षीय राजकारण कवटाळून न बसता शहराच्या विकासाकरिता अशा पद्धतीने घडविला गेलेला थेट पक्षीय सामीलकीचा प्रत्यय म्हणूनच दखलपात्र ठरावा.

महत्त्वाचे म्हणजे, मालेगावबद्दलची आजपर्यंतची वदंता किंवा ओळख विसरायला लावून हे शहर आता कात टाकू पाहते आहे. पण नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर होऊन व आठवा महापौर आरूढ होत असतानाही म्हणावी तितकी प्रगती झालेली दिसून येत नाही. राज्याच्या गेल्या पंचवार्षिक काळात राज्यमंत्री दादा भुसे यांच्या माध्यमातून विकास निधीही लाभला; पण विकासाची दृश्य स्वरूपातील चिन्हे दिसून येऊ शकली नाहीत. शहरातील रस्त्यांची अक्षरश: ‘वाट’ लागली असून, अतिक्रमणांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शहर वाढते आहे, तशा गरजा व समस्याही वाढत आहेत; मात्र त्या निकाली निघताना दिसत नाहीत. निधी येतो, खर्चही होतो; परंतु विकास दिसावा म्हटले तर तो काही दिसत नाही. गावाचा बकालपणा आहे तसाच आहे. त्यामुळे पक्षीय राजकारणातून होणारा परस्पर विरोध बाजूस सारून प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने काँग्रेस, शिवसेना व भाजप या तिघा प्रमुख आणि प्रबळ पक्षीयांनी एकत्र येत घडविलेला ‘पॅटर्न’ मालेगावकरांची अपेक्षा उंचावणाराच आहे. शिवसेनेचे दादा भुसे, काँग्रेसचे शेख रशीद व भाजपचे सुनील गायकवाड या त्रिकुटाची जबाबदारी त्यामुळे वाढून गेली आहे.

मालेगाव महापालिका स्थापनेला विरोध करणारे जनता दल नेते निहाल अहमद यांनीच या महापालिकेचे प्रथम महापौरपद भूषविले. नवनिर्वाचित आठव्या महापौरांपर्यंतचा कार्यकाळ पाहता सर्वाधिक चार वेळा शेख रशीद परिवाराकडेच महापौरपद गेले आहे. पती, पत्नी व मुलानेही हे पद भूषविण्याचा हा विक्रम असावा. ताहेरा शेख यांना दुसऱ्यांदा ही संधी लाभली आहे. खरे तर गेल्या विधानसभा निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवाराने जातीयवाद, धर्मवाद व बिरादरवाद केल्याचा आरोप करीत न्यायालयाचे दरवाजे ठोठावणाºया आसिफ शेख व त्यांचे वडील यांना त्यांचा ‘सेक्युलर’ चेहरा अधिक उजळण्याची संधी या निवडणुकीत होती. पक्षाकडे आरक्षणात बसणारे अन्य दोन उमेदवारही होते, त्यापैकी मंगला भामरे यांचा विचार केला असता तर वेगळा विक्रम झाला असता. शेख यांना पालिकेची सूत्रे आपल्या हातीच कायम ठेवून परिवारवादाचा आरोपही त्यातून टाळता आला असता; पण तसे झाले नाही. अर्थात, जे झाले त्यातून मालेगावची वाटचाल विकासाकडे होण्याची अपेक्षा करता यावी. ताहेरा शेख यांना महापौरपदाचा अनुभव असल्याने या दुसºया ‘टर्म’मध्ये त्या अधिक चांगले काम करू शकतील. त्यांना नीलेश आहेर या नवोदित शिलेदाराची भक्कम जोड लाभली आहे. भुसे यांचे पाठबळ पाठीशी आहेच. त्यामुळे महापालिकेतील सत्तेचा हा अनोखा ‘मालेगाव पॅटर्न’ विकास घडवून आणण्यासाठी व मालेगावकरांच्या अपेक्षापूर्तीत यशस्वी ठरेल, अशी आशा करूया...

Web Title: The unique 'Malegaon pattern' of all-party involvement for development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.