देवळ्यात लसीकरण मोहीम पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 00:53 IST2021-05-06T22:46:19+5:302021-05-07T00:53:57+5:30
देवळा : सलग पाच दिवस कोविड प्रतिबंधक लसीचा साठा संपल्याने देवळा तालुक्यातील सर्व लसीकरण केंद्रे बंद होती. आरोग्य विभागास लस प्राप्त झाल्यानंतर गुरुवारी (दि.६) लसीकरण मोहीम पूर्ववत सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, वाखारी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या नूतन आहेर यांनी खर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन पहाणी केली.

देवळा तालुक्यातील खर्डा येथील लसीकरण केंद्रास जि.प. सदस्य नूतन आहेर यांनी भेट दिली, समवेत ग्रामस्थ.
देवळा : सलग पाच दिवस कोविड प्रतिबंधक लसीचा साठा संपल्याने देवळा तालुक्यातील सर्व लसीकरण केंद्रे बंद होती. आरोग्य विभागास लस प्राप्त झाल्यानंतर गुरुवारी (दि.६) लसीकरण मोहीम पूर्ववत सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, वाखारी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या नूतन आहेर यांनी खर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन पहाणी केली.
देवळा तालुक्यासाठी लसींचा पुरेसा साठा असल्यामुळे सुरुवातीला सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम सुरळीतपणे सुरू होती. काही गावात नागरिकांनी मागणी केल्यानंतर लसीकरण शिबिरेदेखील यशस्वीरित्या घेण्यात आली.
नंतर मध्यंतरी लसींचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे सर्व केंद्रांवरील लसीकरण बंद झाले. यामुळे नागरिकांना पाच दिवस लस मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. गुरुवारी (दि.६) लस उपलब्ध झाल्यानंतर तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रांवर लसीकरण सुरळीतपणे चालू झाले.
दरम्यान, खर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन जिल्हा परिषद सदस्य नूतन आहेर यांनी संशयित रुग्णांची आरोग्य तपासणी, कोविड चाचणी, व कोविड प्रतिबंधक लसीकरण आदींचा आढावा घेतला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अलका सपकाळे, प्रयोगशाळा तज्ज्ञ दीपक जाधव, आरोग्य सेविका अनिता सानप, आरोग्य सेवक पाठक उपस्थित होते.
एक हजार लस उपलब्ध
देवळा तालुक्यासाठी १००० लसीचा साठा उपलब्ध करून देण्यात आला होता. गुरुवारी तालुक्यातील सर्व लसीकरण केंद्रांवर नागरिकांचा लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे लसींचा साठा संपला असून शुक्रवारी नवीन लसीकरण करण्यासाठी लसींचा साठा उपलब्ध होण्याची नागरिकांना प्रतीक्षा आहे.