इंदिरानगरचा परिसर सीसीटीव्हीच्या नजरेखाली
By Admin | Updated: August 23, 2015 23:07 IST2015-08-23T23:06:56+5:302015-08-23T23:07:22+5:30
इंदिरानगरचा परिसर सीसीटीव्हीच्या नजरेखाली

इंदिरानगरचा परिसर सीसीटीव्हीच्या नजरेखाली
इंदिरानगर : इंदिरानगर व राजीवनगर परिसरातील प्रमुख चौक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेखाली आल्याने गुन्हेगारी रोखण्यास मदत होऊन गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जाणार आहे़
इंदिरानगरमध्ये दिवसेंदिवस अपार्टमेंट, सोसायटी व कॉलनी परिसर पर्यायाने लोकवस्ती वाढते आहे़ या वाढणाऱ्या लोकवस्तीबरोबरच गुन्हेगारीदेखील वाढत चालली आहे़ त्यातच गत पंधरा वर्षांपासून स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी १ एप्रिल २०१० ला पूर्ण झाली अन् राजीवनगर झोपडपट्टीलगत एका अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर हे पोलीस ठाणे सुरू झाले़
इंदिरानगर पोलीस ठाण्याची नासर्डी नदी ते विल्होळी अशी मोठी हद्द असून, त्याअंतर्गत सुमारे सात-आठ झोपडपट्ट्या येतात़ त्यातच पोलीस कर्मचाऱ्यांची अपुरी संख्येमुळे गुन्हेगारांचे चांगलेच फावते आहे़ या परिसरात घरफोड्या, सोनसाखळी चोरी, पोलीस बतावणी अशा विविध गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे़ त्यामुळे परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आव्हान करण्यात आले होते़
या परिसरातील युनिक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक सतीश सोनवणे यांनी चार्वाक चौक, भगवती चौक, राणेनगर चौफुली या ठिकाणी स्वखर्चाने बारा सीसीटीव्ही कॅमेरे लावले तर काही दिवसांपूर्वीच योगेश सहाणे यांनी स्वातंत्र्यवीर वि़ दा़ सावरकर चौकात व राजे छत्रपती चौकात प्रत्येकी तीन सीसीटीव्ही कॅमेरे लावले़ या परिसरातील प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याने गुन्हेगारी रोखण्यास मदत होणार आहे़
साईनाथनगर चौफुली व गजानन महाराज मंदिरलगतच्या रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यास संपूर्ण इंदिरानगर परिसरच सीसीटीव्हीच्या नजरेखाली येईल़ (वार्ताहर)