जिल्ह्यातील दहा शाळा अनधिकृत
By Admin | Updated: June 14, 2017 00:03 IST2017-06-14T00:03:08+5:302017-06-14T00:03:37+5:30
यादी जाहीर : मराठासह क्रांतिवीर नाईक शिक्षण संस्थेच्या शाळांचा समावेश

जिल्ह्यातील दहा शाळा अनधिकृत
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील दहा अनधिकृत शाळांची यादी मंगळवारी (दि.१३) जाहीर केली असून, या शाळा बंद करण्याच्या नोटिसा संबंधित शाळा व्यवस्थापनाला बजावण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने शासन नियम-निकषांचे पालन न करणाऱ्या व अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या दहा शाळांची यादी जाहीर केली असून, या शाळांमध्ये पालकांनी त्यांच्या पाल्यांचे प्रवेश न घेण्याचे आवाहन केले आहे. प्रवेश घेतल्यास होणाऱ्या नुकसानीस जबाबदार राहणार नसल्याचेही माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने जाहीर केलेल्या दहा अनधिकृत शाळांच्या यादीत मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सहा, क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेची एक, सद्भावना बहुद्देशीय संस्था नागपूर व धुळे येथील दोन विविध शैक्षणिक संस्थांच्या शाळांचा समावेश आहे. अनधिकृत शाळा - स्व. गोपीनाथ मुंडेसाहेब अनुदानित आदिवासी आश्रमशाळा सादडवाडा, पेठ (८ वी ते १० वी वर्ग), मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेची जनता विद्यालय खडकजांब (८ वी ते १० वी वर्ग), जनता विद्यालय वडबारे, जनता विद्यालय अंगणगाव (५ वी ते ७ वी वर्ग), जनता विद्यालय गवंडगाव (५ वी ते ७ वी वर्ग), जनता विद्यालय आडगाव रेपाळ,(८ वी ते १० वी वर्ग), जनता विद्यालय पिंपळगाव जलाल (८ वी ते १० वी वर्ग), व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेची माध्यमिक विद्यालय निमगाव (८ वी ते १० वी वर्ग), तापी परिसर मंडळाचे शिक्षण प्रसारक माळीज संस्थेचे माध्यमिक विद्यालय कंक्राळे (८ वी ते १० वी वर्ग), शिवमहाराष्ट्र शिक्षण संस्था ककाणीची पूज्य अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय क्रंकाळे (८ वी ते १० वी वर्ग) या दहा शाळांचा अनधिकृत शाळांच्या यादीत समावेश आहे.