उमराणेत कांदा घसरण सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 10:40 PM2021-03-11T22:40:18+5:302021-03-12T00:38:48+5:30

उमराणे : येथील स्व. निवृत्तीकाका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याच्या आवकेत दररोज वाढ होत असतानाच नवीन उन्हाळी कांदाही बाजारात विक्रीसाठी येऊ लागल्याने बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.

Umrane continues to decline | उमराणेत कांदा घसरण सुरुच

उमराणेत कांदा घसरण सुरुच

Next
ठळक मुद्देआठ दिवसांपासून दररोजच दरात दोनशे ते तीनशे रुपयांची घसरण

उमराणे : येथील स्व. निवृत्तीकाका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याच्या आवकेत दररोज वाढ होत असतानाच नवीन उन्हाळी कांदाही बाजारात विक्रीसाठी येऊ लागल्याने बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.

गत सप्ताहाच्या तुलनेत लाल कांद्याच्या दरात तब्बल एक हजार सातशे रुपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. पंधरा दिवसांपूर्वी लाल कांद्याची आवक कमी असल्याने बाजारभाव तेजीत होते. बाजारभाव तेजीत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते.

हेच बाजारभाव टिकून राहणे अपेक्षित असताना लाल कांद्याबरोबरच नवीन उन्हाळी कांदाही बाजारात विक्रीसाठी येऊ लागल्याने कांद्याची आवक वाढली आहे. परिणामी मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर झाला असून, बाजारभाव आणखी कमी होईल, या भीतीपोटी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी गर्दी केली आहे.

त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून दररोजच दरात दोनशे ते तीनशे रुपयांची घसरण होताना दिसून आली. दिवसेंदिवस कांद्याचे बाजारभाव कमी होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, काल बुधवारी (दि. १०) बाजार समितीत १,०३७ ट्रॅक्टर व पिकअप वाहनांमधून सुमारे २० हजार क्विंटल कांद्याची आवक झाल्याचा अंदाज असून, बाजारभाव कमीतकमी ८०१ रुपये, जास्तीत जास्त १,३७१ रुपये, तर सरासरी १,१०० रुपयांपर्यंत होते.


लाल कांदा बाजारभावात गेल्या आठ दिवसात दररोज होत असलेल्या घसरणीचा आलेख -:
१ मार्च - कमी १,५०० रुपये, जास्त ३,०३५ रुपये, सरासरी २,४०० रुपये.
२ मार्च - कमी १,५०० रुपये, जास्त २,८५० रुपये, सरासरी २,१५० रुपये.
३ मार्च - कमी १,२०० रुपये, जास्त २,७५१ रुपये, सरासरी २,५०० रुपये.
४ मार्च - कमी १,००० रुपये, जास्त २,२५० रुपये, सरासरी १,९५० रुपये.
५ मार्च - कमी ८०० रुपये, जास्त २,००१ रुपये, सरासरी १,७५० रुपये,
८ मार्च - कमी ८०१ रुपये, जास्त १,७३१ रुपये, सरासरी १,३५० रुपये,
९ मार्च - कमी ९०१ रुपये, जास्त १,४९१ रुपये, सरासरी १,२२० रुपये,
१० मार्च - कमी ८०१ रुपये, जास्त १,३७१ रुपये, सरासरी १,१०० रुपये.

Web Title: Umrane continues to decline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.