Shiv Sena UBT: आगामी काही महिन्यांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली असून बैठकांना वेग आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी सुरू केली असताना पक्षाच्या नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनीही स्वबळाचा सूर आळवला आहे. "लोकसभा, विधानसभा निवडणुकीत उद्धवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या यशासाठी जिवाचे रान केले. मात्र, काही ठिकाणी मित्रपक्षांचे आपल्या उमेदवारांना असहकार्य मिळाले. आम्ही निवडणूक सोबत लढण्यास इच्छुक आहोत, पण जर असेच चालले तर आगामी महापालिका, नगरपालिका, तसेच जिल्हा परिषद निवडणुकीत वेळप्रसंगी स्वबळावर लढण्याची तयारी ठेवावी लागेल," असा सूर शनिवारी उद्धवसेनेची बैठक व सत्कार समारंभात नेत्यांच्या बोलण्यातून उमटला. हेवेदावे विसरून पक्ष संघटनेसाठी काम करावे, असे आवाहन नेत्यांनी केले.
उद्धवसेनेच्या उपनेतेपदी सुधाकर बडगुजर यांना मिळालेली बढती, तसेच शिवसेना जिल्हाप्रमुखपदी डी. जी. सूर्यवंशी यांची नियुक्ती झाल्याने त्यांचा सत्कार सोहळा शनिवारी दुपारी शालीमार कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी घोलप बोलत होते. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद, तसेच पंचायत समिती त्यांच्या निवडणूक म्हणजे आपल्या पक्षाची एकप्रकारे सत्त्वपरीक्षाच आहे. या निवडणुका जिंकण्यासाठी सर्वानी कंबर कसून उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करावे, असे आवाहन उपनेते आणि माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केले.
अनेकजण पक्षात परतीच्या मार्गावर
उद्धवसेना सोडून शहर व जिल्ह्यातील अनेक नेते, पदाधिकाऱ्यांनी मागील काही महिन्यांत इतर पक्षात प्रवेश केला. पण, त्यातील अनेकांना अपक्ष पक्षांतर करून फसलो असल्याची जाणीव झाली असून, ते पुन्हा उद्धवसेनेत येण्यास इच्छुक आहेत. येणारे दिवस पक्षासाठी चांगले असून, गद्दारांना धडा शिकविला जाईल, असे दत्ता गायकवाड, संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांनी सांगितले.