इच्छुकांनी लावलेले फलक फाडण्याचे प्रकार
By Admin | Updated: January 5, 2017 02:00 IST2017-01-05T02:00:15+5:302017-01-05T02:00:36+5:30
नाशिकरोड : निवडणूक वातावरण तापू लागले

इच्छुकांनी लावलेले फलक फाडण्याचे प्रकार
नाशिकरोड : मनपा निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे तसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. नाशिकरोड भागामध्ये नगरसेवक व इच्छुकांनी लावलेले बॅनर फाडण्याच्या घटना वाढू लागल्या असून, यामुळे निवडणुकीच्या काळात कायदा-सुव्यवस्था कठोरपणे राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.
आगामी मनपा निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या काही कमी नाही. चार लोकप्रतिनिधी असलेला भौगोलिक दृष्ट्या प्रभाग मोठा झाला असला तरी प्रभागातील आपल्या विभागात केलेली कामे असलेल्या जनसंपर्कावर प्रत्येकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. प्रभागाच्या गल्लीबोळात इच्छुकांचे जणू पेवच फुटले आहे अशी सद्यस्थिती आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष, आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांकडून विविध उपक्रम राबविण्याचा धडाकाच लावला आहे. गेल्या साडेचार वर्षांत कधी नव्हे इतके उपक्रम, कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. तसेच या काळात येणाऱ्या विशिष्ट दिवसांचे, सण, जयंती आदिंचे शुभेच्छा देणारे फलक, बॅनर इच्छुकांकडून आपापल्या प्रभागानुसार लावले जात आहे. (प्रतिनिधी)