वाहनाच्या धडकेत जुन्या नाशकातील दोघे युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 01:12 AM2019-12-22T01:12:19+5:302019-12-22T01:14:27+5:30

ओझरवरून काम आटोपून मुंबई-आग्रा महामार्गावरून जुने नाशिककडे परतत असताना आडगावजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील जुन्या नाशकातील दोघे युवक जागीच ठार झाले.

 Two youths killed in vehicle collision | वाहनाच्या धडकेत जुन्या नाशकातील दोघे युवक ठार

वाहनाच्या धडकेत जुन्या नाशकातील दोघे युवक ठार

Next

नाशिक : ओझरवरून काम आटोपून मुंबई-आग्रा महामार्गावरून जुने नाशिककडे परतत असताना आडगावजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील जुन्या नाशकातील दोघे युवक जागीच ठार झाले. नाईकवाडीपुरा येथील सय्यद कुटुंबीयांनी एकुलता एक मुलगा अझहरला या अपघातात गमावले, तर काजीगढीवरील बागवान कुटुंबातील हाजी मलंग हा घरातील कर्ता पुरुषच हरपला. या अपघाताची बातमी रात्री जुन्या नाशकात येताच संपूर्ण जुने नाशिक भागात शोककळा पसरली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, ओझरकडून शुक्रवारी (दि.२०) रात्री नऊ वाजेच्या सुमारास नाशिककडे अ‍ॅक्टिवा दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार हाजी मलंग बागवान (वय ४०, रा. काजीगढी), अझहर इलियास सय्यद (वय २७, रा. नाईकवाडीपुरा) या दोघांचा मृत्यू झाला. पाठीमागून भरधाव जाणाऱ्या वाहनाने अझहर व मलंग या दोघांना चिरडले. अझहर चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर मलंग यांचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण जुन्या नाशकात हळहळ व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वीच अझहरने अ‍ॅक्टिवा दुचाकी खरेदी केली होती. अद्यापपर्यंत दुचाकीला क्रमांकदेखील आरटीओकडून मिळालेला नव्हता. तत्पूर्वीच काळाने या दोघांवर घाला घातला.
मलंग यांनी डोक्यावर हेल्मेट परिधान करून दुचाकी चालवित होते व अझहर हा त्यांच्यासोबत पाठीमागे बसलेला होता, असे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी मलंग यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. बागवान यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक लहान मुलगी, मुलगा, असा परिवार आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक संजय बिडगर हे करीत आहेत.
अझरहरचा नुकताच झाला होता साखरपुडा
सय्यद कुटुंबाचा अझहर हा एकमेव आधार होता. काही महिन्यांपूर्वीच त्याच्या वडिलांचे आजारपणामुळे निधन झाले. तसेच दोन महिन्यांपूर्वीच अझहरचा साखरपुडा झाला होता. या कुटुंबाचा तो एकुलता एक कर्ता मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, दोन विवाहित बहिणी, असा परिवार आहे. अझहरच्या अपघाती मृत्यूने या कुटुंबाने आधार गमावला आहे. त्याच्या पार्थिवाचे जहांगीर कब्रस्तानात शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आले.

Web Title:  Two youths killed in vehicle collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.