अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीचालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 16:07 IST2021-06-30T16:06:13+5:302021-06-30T16:07:04+5:30
नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील रायगडनगर येथे अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि. ३०) सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.

रायगडनगरजवळील अपघातात दुचाकीची झालेली अवस्था.
नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील रायगडनगर येथे अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि. ३०) सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.
नाशिकहून मुंबईकडे जात असताना तुळजा हॉटेलसमोर मोटारसायकलस्वाराला (क्र. एमएच ३१ - एफएन ६०५८) मागून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.
या अपघातात दुचाकी चालक सुनील कुमार महानंद (५०, रा. हैदराबाद) हे गंभीर जखमी झाले. अपघाताचा पुढील तपास वाडिव-हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत.
अपघाती जागा
अनेक दिवसांपासून अपघातांचा हॉटस्पॉट म्हणून रायगडनगरचे नाव समोर येत आहे. गेल्या महिन्याभरापासून विल्होळी ते मुंढेगावदरम्यान अपघातांच्या संख्येत वाढ होत असून, ही अपघातांची मालिका खंडित कधी होणार, असा प्रश्न नागरिक करीत आहेत. रायगडनगर या ठिकाणी महामार्गावर गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणीदेखील नागरिकांनी केली आहे. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.