दो आदमी, करोडो मच्छरआठ हजार
By Admin | Updated: December 25, 2014 23:29 IST2014-12-25T22:49:04+5:302014-12-25T23:29:21+5:30
उत्पत्तीस्थाने : डासांची घनता मापनासाठी पालिकेकडे अपुरे कर्मचारी

दो आदमी, करोडो मच्छरआठ हजार
नाशिक : ‘छे गोली और आदमी तीन... बहुत नाइन्साफी है ये...’ गाजलेला हिंदी चित्रपट ‘शोले’मधील गब्बरला हा प्रश्न पडला आणि त्याने त्याच्या पिस्तुलातील तीन गोळ्या खाली करून तो सोडविलादेखील. नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाला मात्र शहरातील डासांची घनता मोजण्यासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडविण्याबाबत गब्बरइतके अजून यश आलेले नाही. सुमारे वीस लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या आणि २५९.१३ चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेल्या नाशिक शहरात पालिकेनेच सर्वेक्षण केलेली ७९४७ डासांची उत्पत्तीस्थाने आहेत; परंतु संपूर्ण शहरात डासांची घनता मोजण्यासाठी महापालिकेकडे अवघे दोन कर्मचारी अर्थात कीटक समाहरक आहेत. त्यामुळे ‘दो आदमी और करोडो मच्छर’ हा प्रश्न पालिकेने लवकर सोडविला नाही तर ‘यशवंत’ चित्रपटातील नाना पाटेकरने म्हटलेल्या ‘एक मच्छर आदमी को...’ या संवादाची आठवण कायम होत
राहील.
गेल्या काही महिन्यांपासून शहरात डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले होते. आता थंडीमुळे डासांचा उपद्रव काहीसा कमी झाल्याने डेंग्यूच्या रुग्णसंख्येत घट होत आहे. डेंग्यूची लागण इडिस डासामुळे होत असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाने या डासांच्या अळ्या शोधण्यासाठी शहर पालथे घातले. त्यासाठी सारी यंत्रणा कामाला लावली. अळ्या नष्ट केल्या. धूर व औषध फवारणी केली. मात्र, याचदरम्यान पालिकेचे दोन कर्मचारी संपूर्ण शहरात डासांची घनता मोजण्याचे काम करत होते. कोणत्या भागात डासांची घनता किती आहे, त्यानुसार पालिकेचा आरोग्य विभाग धूर व औषध फवारणीचे नियोजन करत होता. त्यामुळे सदर दोन कर्मचाऱ्यांवरच खऱ्या अर्थाने शहराचे आरोग्य अवलंबून आहे, असे म्हटले तर वावगे ठरूनये.
नाशिक महापालिका हद्दीत सहा विभाग आहेत. त्यातील प्रत्येकी तीन विभाग सदर दोन कर्मचाऱ्यांना वाटून देण्यात आले असून, हे कीटक समाहरक दररोज सकाळी आणि सायंकाळी आपापल्या विभागात फिरतात आणि ज्या ठिकाणी डासांचा जास्त उपद्रव असेल त्या भागात जाऊन एका परीक्षानळीत डास ओढून घेतात. त्याचे निरीक्षण करतात.
एका भागात किती वेळ थांबल्यानंतर परीक्षानळीत किती डास गोळा होतात, यावरून त्याची घनता काढली जाते. पाच पेक्षा अधिक घनता आढळून आल्यास सदर भागाने डासांच्या बाबतीत धोकादायक पातळी ओलांडल्याचे निश्चित केले जाते. त्यानुसार आरोग्य विभागाकडून धूर व औषध फवारणी केली जाते. डासांची घनता मोजणारे अवघे दोन कर्मचारी असल्याने आणि त्यांच्याकडून सकाळी आणि सायंकाळी यावेळी विशिष्ट वेळेतच परीक्षण करावयाचे असल्याने त्यांची धावपळ उडताना दिसून येते. त्यात सदर कर्मचारी आपल्या कामाला कितपत न्याय देत असेल याबाबत शंकाच आहे.
वास्तविक शहराची वाढती लोकसंख्या आणि वाढते नागरीकरण लक्षात घेता तसेच डासांची सुमारे आठ हजार कायम उत्पत्तीस्थाने पाहता सहा विभागांत प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. महापालिकेने सर्वप्रथम कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न सोडवावा अन्यथा कागदोपत्री घनतामापन होत राहील आणि दिवसेंदिवस शहरातील आरोग्याचा प्रश्न आणखी गंभीर बनत जाईल. (प्रतिनिधी)