दोघा जिगरबाजांची कोकण कड्यावर सायकलने स्वारी!
By Admin | Updated: November 24, 2014 00:27 IST2014-11-24T00:27:31+5:302014-11-24T00:27:53+5:30
अशीही जिद्द : तीन तासांचा थरार; अनेकांनी परावृत्त करूनही पाच हजार फूट उंचावर दुर्गप्रेमी युवक पोहोचले सायकलने

दोघा जिगरबाजांची कोकण कड्यावर सायकलने स्वारी!
नाशिक : कोकण कडा... भंडारदऱ्याजवळच्या हरिश्चंद्र गडाच्या माथ्यावरील समुद्रसपाटीपासून तब्बल पाच हजार फूट उंच कडा... घनदाट जंगल, नदी, नाले, दुर्गम कपाऱ्या पार करून तेथे पोहोचावे लागते. अनेक दुर्गप्रेमी या कड्याला भेट देत असतात; मात्र मुंबईच्या दोघे दुर्ग व सायकलप्रेमी युवकांनी चक्क सायकलने कोकण कडा गाठून जणू विक्रमाचीच नोंद केली. कोकण कड्यावर सायकलने स्वारी करण्याचे हे पहिलेवहिले धाडस ठरले आहे.
सॉफ्टवेअर इंजिनिअर सचिन वाडेकर आणि उत्पादन शुल्क अधिकारी सिद्धेश काकाणी अशी या दोघांची नावे. हे दोघे मुंबई-गोवा, मुंबई-पुणे, माळशेज घाटावर नेहमी सायकलिंग करतात. आरोग्य उत्तम राखण्यासाठी सायकलिंग आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हे दोघे हरिश्चंद्र गडावरील कोकण कड्यावर सायकलने पोहोचण्याच्या जिद्दीने तेथे गेले. पायथ्याजवळच्या गावात गाडी पार्क करून, सायकलचे वेगवेगळे पार्ट जोडून त्यांनी सायकली तयार केल्या. हेल्मेट, पाणी, खाद्यपदार्थ बरोबर घेऊन ते कोकण कड्याची मोहीम फत्ते करायला निघाले. रस्त्यात अनेक पर्यटकांनी त्यांना सायकल वर न नेण्याचा सल्ला दिला. काहींनी तर त्यांना वेड्यातही काढले; पण त्यांचा निर्णय पक्का होता. कधी सायकली खांद्यावर टाकत, तर कधी चालवत, तर कधी अवघड कपारीतून वाट काढत तीन तासांच्या प्रवासानंतर ते कोकण कड्यावर पोहोचले. या परिसरात नाशिकच्या दुर्ग संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित गड-किल्ले स्वच्छता अभियानात भाग घेऊन गड-किल्ले वाचविण्यासाठी आम्हीदेखील प्रयत्न करू, असे आश्वासनदेखील त्यांनी दिले. वीकेण्डला घरात आराम करण्यापेक्षा व्यस्त कामातून वेळ काढून सायकलिंग वा ट्रेकिंग केल्यास कोणताही आजार जडणार नाही, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.