दोन जेसीबींना चक्क एकच नंबरप्लेट
By Admin | Updated: January 16, 2015 23:44 IST2015-01-16T23:44:30+5:302015-01-16T23:44:44+5:30
सहायक वाहन निरीक्षकाची सतर्कता; मालकावर दंडात्मक कारवाई

दोन जेसीबींना चक्क एकच नंबरप्लेट
नाशिक : प्रादेशिक परिवहन कार्यालयात एका जेसीबीच्या नोंदणीवर दोन जेसीबी चालविणाऱ्या मालकाचा सहायक मोटर वाहन निरीक्षक अतुल चव्हाण यांनी पर्दाफाश केला आहे़ या जेसीबींद्वारे व्यवसाय करून शासनाचा सुमारे पावणेदोन लाखांचा महसूल जेसीबी मालकाने बुडविला आहे़ दरम्यान, संबंधित जेसीबीमालकावर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दंडात्मक कारवाई केली असून, यानंतर फौजदारी गुन्हादेखील दाखल करण्यात येणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली आहे़
मखमलाबाद येथील किशोर घुगे यांनी २००५ साली एक जेसीबी मशीन खरेदी केले व त्याची रितसर प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी केली़ या नोंदणीनंतर या जेसीबीला एमएच १५ एयू ६९४२ हा क्रमांक देण्यात आला़ यानंतर घुगे यांनी २००७ साली दुसरे जेसीबी खरेदी केले मात्र या मशीनची नोंदणी आरटीओ कार्यालयाकडे केलीच नाही़ जेसीबी हे वाहन ट्रान्सपोर्टमध्ये वा व्यावसायिक प्रणालीत मोडते़ त्याचा दरवर्षी आरटीओ टॅक्स भरावा लागतो़ मात्र मालक घुगे यांनी या वाहनाचा सात वर्षांपासून टॅक्सच भरलेला नाही़
एकाच जेसीबीच्या नोंदणीवर दोन जेसीबी चालवून घुगे यांनी सात वर्षांपासून शासनाच्या महसूल बुडविला असून, तो सुमारे दीड ते पावणेदोन लाख रुपये आहेत़ प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत हे दोन्ही जेसीबी मशीन जप्त करण्यात आले असून, दंडात्मक कारवाई केली जाणार आहे़ तसेच दंड वसुलीनंतर फौजदारी गुन्हाही दाखल केला जाणार असल्याचे वृत्त आहे़ (प्रतिनिधी)