दोघे तोतया पोलीस निघाले सोनसाखळी चोर; दहा गुन्हे उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 16:12 IST2019-11-26T16:10:05+5:302019-11-26T16:12:08+5:30
सोनसाखळी चोरीचे १० गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी एकूण २३ तोळे सोने हस्तगत केल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दोघे तोतया पोलीस निघाले सोनसाखळी चोर; दहा गुन्हे उघडकीस
नाशिक : महामार्गावर दुचाकी उभ्या करून ट्रकचालकांची कागदपत्रे तपासणीच्या नावाखाली लूट करणाऱ्या दोघा तोतया पोलिसांच्या काही दिवसांपुर्वी पंचवटी पोलिसांनी मुसक्या बांधल्या. हे दोघे तोतया पोलीस सोनसाखळी चोर असल्याचे तपासात उघड झाले असून त्यांच्याकडून सोनसाखळी चोरीचे १० गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी एकूण २३ तोळे सोने हस्तगत केल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहर पोलीस आयुक्तालयातील म्हसरूळ, पंचवटी, इंदिरानगर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटना अलिकडे वाढल्या होत्या. या घटनांना आळा घालण्यासाठी उपआयुक्त अमोल तांबे यांनी सर्वच पोलीस ठाण्यांना सतर्कतेच्या सुचना देत गस्तसुधार करण्याचे आदेश दिले. तोतया पोलिसांकडून झालेल्या लुटीच्या गुन्ह्याचा तपासाला पंचवटी पोलिसांनी गती दिली. पोलीस निरिक्षक के.डी.पाटील, उपनिरिक्षक सुनील कासर्ले, संजय वानखेडे, हवालदार सुरेश नरवडे, संदीप शेळके, विष्णू जाधव आदिंच्या पथकाने सापळा रचून तलाठी कॉलनी भागातून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अधारे अक्षय सदाशिव दोंदे (२१), भूषण जाधव (२२) या दोघा संशयितांना अटक केली. त्यांची कसून चौकशी करत ‘खाकी’चा हिसका दाखविला असता त्यांनी सोनसाखळी चोरीची कबुली दिली.