दोनशे धार्मिक संस्था जागेसाठी आग्रही
By Admin | Updated: March 21, 2015 23:28 IST2015-03-21T23:27:39+5:302015-03-21T23:28:05+5:30
कुंभमेळा : ताळमेळ बसविण्याचे प्रशासनापुढे आव्हान

दोनशे धार्मिक संस्था जागेसाठी आग्रही
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातून येणाऱ्या साधू-महंतांसाठी तपोवनात साधुग्रामसाठी पुरेशी जागा मिळत नसल्याने त्यासाठी जिल्हा प्रशासन दमछाक करीत असतानाच, आखाडे-खालशांपेक्षा देशभरातील सुमारे दोनशेहून अधिक धार्मिक संस्थांनी तपोवनात जागांसाठी आग्रह धरल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. मुळात आखाडे, खालशांसाठी तपोवनातील जागा पुरेशी नसताना, त्यात जागेची मागणी करणाऱ्या या संस्थांनी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या शिफारशी त्यासाठी सादर केल्यामुळे ताळमेळ बसविणे अवघड होऊन बसले आहे.
तपोवनात साधुग्रामसाठी आजपावेतो सुमारे २८३ एकर जागा तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहीत करून जिल्हा प्रशासनाने ती महापालिकेकडे सुपूर्द केली असून, त्यावर कामकाजास सुरुवात झालेली आहे. गेल्या कुंभमेळ्यापेक्षा यंदाच्या कुंभात साधू-महंतांचे आखाडे व खालशांची संख्या अधिक राहणार असल्याने किमान पाचशे एकर जागेची मागणी साधू-महंतांनी यापूर्वी केली होती; परंतु प्रशासनाने केलेल्या नियोजनात सव्वातीनशे एकर जागेवर साधुग्राम उभारण्याची तयारी दर्शविली व त्यास काहीअंशी साधू-महंतांनीही सहमती दर्शविली. परंतु सद्यस्थितीत सव्वातीनशे एकर जागाही पूर्ण ताब्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तपोवनातील जनार्दन आश्रम, तपोवन ब्रह्मगिरी आश्रम अशा पाच आश्रमांच्या ताब्यात असलेली ३३ एकर जागा देण्यास नकार दिला आहे. या आश्रमांच्या प्रमुखांच्या म्हणण्यानुसार सिंहस्थात त्यांच्या आश्रमातही साधू व भाविक मोठ्या संख्येने येणार असल्याने त्यांच्या सोयीसाठीच ही जागा ताब्यात ठेवल्याचे म्हणणे आहे. त्यामुळे सद्यस्थितीत तपोवन २८३ एकर वरच उभे राहणार असून, त्यातील जागेचे वाटप आखाड्यांच्या मागणीनुसार केले जाणार आहे. तत्पूर्वीच गेल्या महिन्यापासून सुमारे दोनशेहून अधिक धार्मिक संस्थांनी दोन ते पाच एकर जागा कुंभमेळ्यात धार्मिक कार्यक्रमांसाठी मिळावी म्हणून मागणी करण्यास सुरुवात केली आहे. अलाहाबाद, उज्जैन, मथुरा, दिल्ली, हरिद्वार, मुंबई, जयपूर, बिहार अशा देशातील प्रमुख धार्मिक ठिकाणांहून जिल्हा प्रशासनाकडे पत्रांचा वर्षाव होत आहे. जागा मागणीच्या या पत्रांबरोबर राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व आमदार, खासदार, मंत्र्यांचे शिफारसपत्र सोबत जोडले जात असल्यामुळे या मागणीचा अनादर कसा करावा, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे. एकीकडे साधुग्रामसाठी अपुरी जागा त्यातच धार्मिक संस्थांचे तगादे पाहता साधुग्रामचा ताळमेळ बसविणे अवघड झाले आहे. तरीही साधुग्रामच्या जागेसाठी अगोदर आखाडे, खालशांना प्राधान्य देण्याचे व त्यानंतर धार्मिक संस्थांचा विचार करण्याचे ठरले आहे.