रेल्वेच्या धडकेने दोन हरणे ठार
By Admin | Updated: September 1, 2015 22:07 IST2015-09-01T22:05:57+5:302015-09-01T22:07:00+5:30
समीट रेल्वेस्टेशन : पाण्याअभावी जातो आहे वन्यप्राण्यांचा प्राण

रेल्वेच्या धडकेने दोन हरणे ठार
तळेगाव रोही : समिट रेल्वेस्टेशनजवळ गोरखपूर एक्स्प्रेसने धडक दिल्याने दोन हरणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, गेल्या आठ दिवसांपूर्वी याच परिसरात
पाण्याच्या शोधात आलेल्या
एका हरणाचा तरुणांच्या समयसूचकतेने प्राण वाचले असून, वनविभागाने वन्यप्राण्यांचे प्राण वाचविण्यासाठी पिण्याचे पाण्याची सोय व योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातून होत आहे.
चांदवड तालुक्यातील समिट रेल्वेस्टेशनजवळ दोन किमी अंतरावर गेट क्रमांक ११० वडगावनजीक दुपारी ३.५३ वाजेची डाऊन गोरखपूर एक्स्प्रेस जात असताना, सहा हरणांचा कळप रेल्वेरूळ ओलांडत असताना दोन नर जातीची हरणे रेल्वेखाली सापडली व मरण पावली. त्यातील चार हरणे सुदैवाने बचावली. या मृत हरणांना वनअधिकारी जोजार, समाधान ठाकरे, पशू अधिकारी डॉ. जोंधळे यांनी शवविच्छेदन करून वन परिक्षेत्रात खड्डा खोदून त्यांचा अंत्यविधी केला.
या परिसरात वनक्षेत्र ३८६ हेक्टर असून, याच क्षेत्रावर पोल्ट्री व्यावसायिक मृत कोंबड्या या जागेत टाकतात. त्यामुळे परिसरातील मोकाट कुत्री या वन्यप्राण्यांना त्रास देतात. वनविभागाकडून मारुती शंकर मोरे हे एकमेव कर्मचारी या वन्यप्राण्यांची देखभाल करण्याचे काम अल्प मानधनावर करीत आहेत.
या परिसरात ५० ते ६० हरणांचा कळप आहे, तर २०० ते ३०० मोर आहेत. त्यांना पिण्यासाठी सीमेंटच्या वीस लिटरच्या चार टाक्या आहेत. त्यात दोन टाक्या या शंकर मालसाणे या शेतकऱ्यांच्या विहिरीजवळ आहेत. त्या पण खूपच लहान आहेत. गुरे चारणारे याच वनक्षेत्रात गुरे चारतात. व तेही त्याच ठिकाणचे पाणी गुरांनाही पाजतात.
या परिसरात प्रचंड पाणीटंचाई असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. पाण्यासाठीच या दोन हरणांचा प्राण गेला असावा, असा अंदाज परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला. गेल्या आठवड्यात एक हरीण राजू बढे यांच्या विहिरीत पडले होते. त्याचे प्राण परिसरातील तरुणांनी वाचविले. चांदवडचे वनपरिमंडळ अधिकारी ए. डी. सोनवणे यांनी या वनजमिनीत सरंक्षक भिंतीचा प्रस्ताव नुकताच वरिष्ठांकडे पाठविला असल्याचे समजते.
या वनक्षेत्रात गेल्या आठवड्यातच वृक्षारोपण करण्यात आले असून, त्यात मोहाडी, बोर, शिवणी, खैर, कडुनिंब, करंजी अशी विविध झाडे लावलेली आहेत. परिसरातील वन्यप्राण्यांसाठी त्वरित पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी राजू बढे, अमोल युवराज यांनी केली आहे. (वार्ताहर)