Two arrested in Chandan burglary | चंदन चोरीतील दोघांना अटक
चंदन चोरीतील दोघांना अटक

ठळक मुद्देयुनिट दोनची कारवाई : तस्करांचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता

नाशिक : शहरातील महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या आवारातील चंदनाच्या झाडांची चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाला यश आले आहे. नाशिक शहरात गेल्या दोन महिन्यांत २८ चंदन वृक्ष कापून अथवा तोडून चंदनाच्या लाकडाची चोरी केल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. विशेष म्हणजे चंदन चोर शहरातील सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणाºया महाराष्ट्र पोलीस अकादमी, सीबीएस येथील पोलीस अधीक्षकांचे शासकीय निवासस्थान, देवळाली कॅम्प येथील आर्टिलरी सेंटरसह वेगवेगळ्या विभागांच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या निवासी परिसरातून चंदन चोरी करीत असल्याने या चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. अखेर गुन्हे शाखेच्या युनिट दोनला यातील दोघांना पकडण्यात यश आले आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट दोनचे पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी चोरट्यांचा शोध सुरू करीत खबºयांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शहरालगत असलेल्या ग्रामीण भागात पाल टाकून राहणाºया समूहातील काहीजण चंदनाची चोरी करीत असल्याचे समजल्यानंतर सहायक पोलीस उपनिरीक्षक श्यामराव भोसले, हवालदार देवकिसन गायकर, पोलीस नाईक संजय ताजने, शंकर काळे, पोलीस नाईक परमेश्वर दराडे, गुलाब सोनार, मोतीलाल महाजन, पोलीस शिपाई महेंद्र साळुंखे, योगेश सानप, बाळा नांद्रे आदींनी सापळा रचून गिरणारे गावातून पाथर्डी गावातील संजय माणिक जाधव (२५) आणि पळसे शिवारातून अनिल उत्तम जाधव (१९) या दोघा संशयितांना अटक केल्याची माहिती पोलीस पाटील यांनी दिली.
चार ठिकाणी चोरी केल्याची कबुली
पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांकडे विचारपूस केली असता त्यांनी सातपूर औद्योगिक वसाहतीतील कंपनीतील सुरक्षारक्षकास करवतीचा धाक दाखवून चंदन चोरी केल्याची, तसेच महाराष्ट्र पोलीस अकादमीतील चंदन चोरी केल्याची कबुली दिली. या संशयितांनी चार ठिकाणी चंदन चोरी केल्याची कबुली दिली असून, पोलिसांनी त्यांच्याकडून टाटा इंडिगो सीएस ही कार जप्त केली आहे. या संशयितांचा ताबा सातपूर पोलिसांकडे देण्यात आला आहे.


Web Title: Two arrested in Chandan burglary
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.