‘ओस्प्रे ईगल’चे वीस वर्षांनंतर आगमन

By Admin | Updated: December 20, 2015 23:44 IST2015-12-20T23:39:10+5:302015-12-20T23:44:44+5:30

नांदूरमधमेश्वरला ‘संमेलन’ : मोठ्या रोहित, लाल शिर

Twenty years after arrival of 'Osprey Eagle' | ‘ओस्प्रे ईगल’चे वीस वर्षांनंतर आगमन

‘ओस्प्रे ईगल’चे वीस वर्षांनंतर आगमन

अझहर शेख ,नाशिक
समुद्रकिनारी किंवा बारमाही वाहणाऱ्या मोठ्या नद्यांच्या काठावर आढळणारा गरुड प्रजातीमधील ‘ओस्प्रे ईगल’ अर्थात समुद्रगरुडाचे देश-विदेशातील स्थलांतरित पक्ष्यांचे नंदनवन असलेल्या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात तब्बल २० वर्षांनंतर पुन्हा आगमन झाले आहे. सुमारे अर्धा डझन ‘ओस्प्रे ईगल’ येथील जलाशयावर भरारी घेताना दिसत आहे. नांदूरमधमेश्वर अभयारण्यात हिवाळ्यात भरणाऱ्या पक्ष्यांच्या संमेलनाने उंची गाठली आहे. राज्यासह परराज्यांमधूनही पक्षिप्रेमी व पर्यटक येथे दाखल होत असून, ‘वीकेण्ड’ला जणू अभयारण्याला जत्रेचे स्वरूप प्राप्त होत आहे.
दरवर्षी हिवाळ्याची चाहूल लागताच पाहुण्या देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांनी नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य गजबजून जाते. यावर्षी बदलत्या हवामानामुळे डिसेंबरचा दुसरा आठवडा संपूनही कडाक्याची थंडी जाणवत नसल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पक्ष्यांचे प्रमाण कमी आहे; मात्र डिसेंबर अखेर पक्ष्यांच्या संख्येत अधिक भर पडणार असल्याचे नांदूरमधमेश्वर अभयारण्य परिसरातील पक्षिनिरीक्षकांनी सांगितले.
नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यामधील गोदावरी-कादवा नदीच्या संगमावर असलेल्या नांदूरमधमेश्वर धरणाच्या पाणथळ दलदलीमध्ये सध्या देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांचा मेळा भरला आहे. दरवर्षी हिवाळ्याची चाहूल लागताच या ठिकाणी हजारो किलोमीटर अंतरावरून स्थलांतरित पक्ष्यांचे थवे उतरतात. मोठा रोहित (फ्लेमिंगो), शाम कादंब (ग्रे लेग गूस) लाल शिराचा बदक (रेड क्रिस्टेड पोचार्ड) यांसारखे दुर्मिळ पक्षी लक्ष वेधून घेत आहेत. विविध प्रजातीच्या शेकडो स्थलांतरित पक्ष्यांचे संमेलन उंची गाठत असताना यावर्षी शिकारी पक्षी ‘ओस्प्रे ईगल’ समुद्रगरुडाचा थरारही अभयारण्यामध्ये पहावयास मिळत आहे. दहशत येथील ‘पाहुण्यां’मध्ये पहावयास मिळत आहे.

असे आहे ‘ओस्प्रे’चे वैशिष्ट्य
ओस्प्रे ईगल अर्थात समुद्रगरुड हा साधारणत: उत्तर अमेरिके मध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. हा गरुड जातीतला शिकारी पक्षी असून, समुद्र अथवा मोठय़ा नद्यांच्या काठावर विहार करत भक्ष्य शोधतो. नदीपात्रातील मासे हे याचे आवडते खाद्य आहे. या पक्ष्याचा आकार साधारण ५४ ते ५८ सेंटीमीटरपर्यंत असतो. जेव्हा हा गरुड भरारी घेतो तेव्हा त्याच्या पंखांचा आकार सुमारे पाच ते आठ फुटापर्यंत होतो. हिवाळ्यामध्ये हा गरुड मोठय़ा अंतरापर्यंत खाद्याच्या शोधात प्रवास करतो.

..या पक्ष्यांचा किलबिलाट
जांभळी पाणकोंबडी, थापट्या बदक, तरंग, भुवई बदक, चक्रवाक (ब्राह्मणी), गढवाल, तलवार बदक, नकटा बदक, जांभळा बगळा, राखाडी बगळा, लाल सरी बदक, हळदी-कुंक, मराल, टिबुकुली बदक, रंगीत करकोचा, उघड्या चोचीचा करकोचा, मोर शराटी, पांढरा शराटी, ग्रे-हेडेड फ्लायकॅचर, चित्र बलाक (पेंटेड स्टॉर्क), उघड्या चोचीचा बलाक (ओपन बिल स्टॉर्क), पांढर्‍या मानेचा करकोचा, छोटा शराटी (ग्लॉसी आयबीज), काळा शराटी (ब्लॅक आयबीज), पांढरा शराटी, चमचा बगळा (स्पूनबील), दलदल ससाणा (मार्श हॅरियर), कापशी घार, चमचा बगळा, मालगुजा, कमळ, दलदल ससाणा, ठिबकेदार गरुड, कापसी ससाणा, सर्प गरुड आदि पक्ष्यांनी अभयारण्य गजबजून गेले आहे. पर्यटकांची पावले आपोआप वळू लागली आहेत.

सलग दुसर्‍यांदा ‘शाम कादंब’ अभयारण्यात
शाम कादंब (ग्रे लॅग गूस) हा स्थलांतरित पक्षी आहे. साधारणत: हा पक्षी उत्तर आफ्रिक ा किंवा मध्य आशियामध्ये आढळून येतो. गेल्या वर्षी एक जोडी नांदूरमधमेश्‍वर अभयारण्यात अवघे तीन दिवसांपर्यंत मुक्कामी आली होती; मात्र यावर्षी तीन जोड्या गेल्या आठवडाभरापासून अभयारण्यातील पाणथळ जागेवर पहावयास मिळत असल्याचे पक्षीनिरीक्षक गंगाधर आघाव यांनी सांगितले. या पक्ष्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणचे त्याची उंची साठ ते सत्तर सेंटिमीटर असून, रंग करडा मातकट, चोच गुलाबी मांसल असते. हा पक्षी हंसाचा मूळपुरुष असल्याचे समजले जाते. हा पक्षी प्रामुख्याने पाणथळ जागेतील वनस्पती, गवत खातो. अभयारण्यात पाणकणीस, तसेच अन्य वनस्पती भरपूर प्रमाणात असल्यामुळे हंस प्रजातीच्या शाम कादंबने पुन्हा ‘भरतपूर’ला पसंती दिली आहे.

Web Title: Twenty years after arrival of 'Osprey Eagle'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.