केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत वीस हजारावा बोगस डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:31 IST2021-09-02T04:31:01+5:302021-09-02T04:31:01+5:30
दोन दिवसांपूर्वी भाजपाच्या केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या जन आशीर्वाद यात्रेप्रसंगी नगरसेविका भाग्यश्री ढोमसे यांनी त्यांच्या प्रभागातील हेडगेवार चौक ...

केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत वीस हजारावा बोगस डोस
दोन दिवसांपूर्वी भाजपाच्या केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या जन आशीर्वाद यात्रेप्रसंगी नगरसेविका भाग्यश्री ढोमसे यांनी त्यांच्या प्रभागातील हेडगेवार चौक येथील मनपा केंद्रावर वीस हजार डोस पूर्ण झाल्याचे सांगत, याबाबत थेट केंद्रीय मंत्री भारती पवार यांना त्या केंद्रावर बोलावून मनपा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सत्कार केला. परंतु ही बाब शिवसेनेच्या त्याच प्रभागाचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांना खटकली. त्यामुळे त्यांनी मंगळवारी (दि. ३१) सिडको प्रभाग सभेत हा मुद्दा उपस्थित करून, आरोग्य अधिकाऱ्यांकडून सिडको भागातील लसीकरण केंद्राची संपूर्ण माहिती घेतली. तसेच यावेळी सिडकोतील कोणत्या केंद्रामध्ये सर्वाधिक लसीकरण झाले, याचीदेखील माहिती घेतली. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी नवीन बाजी यांनी मनपाच्या मोरवाडी येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात सर्वाधिक बारा हजाराच्या आसपास लसीकरण झाल्याचे सभेत सांगितले, तर हेडगेवार चौक येथील मनपा केंद्रावर केवळ अकरा हजार इतकेच लसीकरण झाल्याचे सभेत सांगितले. यावरून बडगुजर यांनीदेखील अधिकाऱ्यांचा समाचार घेतला व भाजपा महिला नगरसेविकांनी वीस हजार डोस दिल्याचा गाजावाजा कसा केला, असा सवालही विचारला. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल करणारे शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर व भाजपा यांच्यातील वाद आधीच चिघळलेला असताना बडगुजर यांनी पुन्हा या मुद्द्यावर बोट ठेवत सिडकोतील लसीकरणाचा मुद्दा समोर आणल्याने शिवसेना भाजपचा वाद यापुढेही अधिक चिघळण्याची चिन्हे यावरून दिसून आली.
(फोटो ३१ सिडको)
सिडको प्रभाग सभेत सिडकोतील लसीकरणासंदर्भात मनपाच्या वैद्यकीय अधिकारी नवीन बाजी यांच्याकडून माहिती घेताना शिवसेना नगरसेवक सुधाकर बडगुजर.