पंचवीस लाखांना गंडा
By Admin | Updated: September 13, 2016 00:54 IST2016-09-13T00:52:57+5:302016-09-13T00:54:53+5:30
बागलाण : बचतगटाच्या नावाखाली लूट

पंचवीस लाखांना गंडा
सटाणा : बचतगट स्थापन करून कर्ज काढून देतो, असे आमिष दाखवून आदिवासींना लाखो रुपयांना गंडा घालणारी टोळी बागलाण व मालेगाव तालुक्यात सक्रिय झाली आहे. दोन महिलांसह सहा जणांच्या या टोळीसंदर्भात जायखेडा पोलीस ठाण्यात अनेकवेळा तक्रार करूनही पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात आहे. आदिवासींना लुटणाऱ्या या टोळीला गजाआड करून पैसे वसूल करावेत, या मागणीसाठी भाजपा महिला आघाडीच्या सरोज चंद्रात्रे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांनी तहसीलदार सुनील सौंदाणे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
आदिवासींना गंडा घालणारी ही टोळी आजही सक्रिय असून, तालुक्यातील आदिवासींना लुटत आहे. याबाबत जायखेडा पोलीस ठाण्यात अनेकवेळा तक्रार केली; मात्र पोलिसांनी अद्याप कुठलीही दखल न घेतल्याने ही टोळी उजळ माथ्याने फिरत आहे. पोलीस यंत्रणेने तत्काळ या टोळीला जेरबंद करून आदिवासी बांधवांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तहसीलदार सौंदाणे यांनी या प्रकरणी चौकशी करून आदिवासींना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. याप्रसंगी भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सरोज चंद्रात्रे, शहराध्यक्ष पुष्पलता पाटील, उपाध्यक्ष मंगला मेणे यांच्यासह अण्णा मोरे, देवकाबाई सोनवणे, दौलत सोनवणे, कैलास माळी, लक्ष्मण अहिरे, बापू अहिरे, सीताराम अहिरे, शरद मोहिते, आत्माराम पिंपळसे, दादाजी अहिरे, अशोक बोरसे, शरद सोनवणे, दत्तू सोनवणे आदि आदिवासी बांधव उपस्थित होते. (वार्ताहर)