कांद्याची रोपे करपली
By Admin | Updated: September 1, 2015 22:37 IST2015-09-01T22:36:42+5:302015-09-01T22:37:51+5:30
पाणीटंचाई : द्यानेत चार दिवसाआड पाणी; पशुधन संकटात

कांद्याची रोपे करपली
दुगाव : दुगाव व परिसरातील गंगावे, विटावे, अहिरखेडे, कोकणखेडे, डोंगरगाव आदि गावांमध्ये लागवडीयोग्य कांद्याची रोपे पावसाअभावी लागवड न करता आल्याने खराब झाली आहेत. सुमारे दहा ते बारा हजार रुपये पायलीचे कांदा बियाणे शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर टाकले; परंतु पाऊस न पडल्याने कांद्याची रोपे व बियाणे वाया गेली असून, लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
मका, बाजरी, सोयाबीन, तूर, मूग, भुईमूग आदि पिके पावसाअभावी अर्ध्यावरच जळून गेली आहेत. रासायनिक खते, बी-बियाणे, औषधे यावर हजारो रुपये खर्च करून उभी केलेली पिके वाया गेल्याने शेतकरी चिंताक्रांत झाला आहे. दुष्काळी परिस्थिती उद्भवल्याने चारा व पाणीटंचाईमुळे पशुधन सांभाळणे अवघड झाले आहे. शेती व्यवसायावर अवलंबून असलेले सर्वच व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले आहेत. त्यामुळे व्यापारीवर्गाला मोठा फटका बसला आहे.
दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
द्याने : द्यानेसह परिसरात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतीचा प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाने बागलाण तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी द्यानेचे उपसरपंच मधुकर कापडणीस, समीर सावंत यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
नक्षत्रामागून नक्षत्रे कोरडी गेल्याने मका, बाजरी, भुईमूग ही पिके वाया जाण्याची शक्यता आहे. पावसाने पाठ फिरविल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. द्याने येथे चार दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने हंडाभर पाण्यासाठी महिलांना रात्र जागून काढावी लागत आाहे. ऐन पावसाळ्यात भीषण पाणीटंचाई जाणवत असून, विहिरींनी तळ गाठल्याने जनावरांना चारा-पाणी मिळेनासा झाला आहे. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला होता. यंदा प्रथमच पावसाने दडी मारल्याने बेकायदा वाळूउपसा मोठ्या प्रमाणावर होत आहे. याकडे महसूल विभाग दुर्लक्ष करीत आहे. द्यानेतील पाणीपुरवठा विहीरी आटल्याने गावाचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. नद्या, नाले कोरडी पडली आहेत. चारा-पाणी मिळत नसल्याने पशुधन संकटात सापडले आहे. भुरट्या चोरांनीही धुमाकूळ घातला आहे. स्वत:ला विकासाचे शिलेदार समजणारे पाहणी दौरे करीत आहेत. द्यानेसह परिसरात भीषण दुष्काळ पाहता बागलाण तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी आसखेडेचे सरपंच साहेबराव कापडणीस, सोनू सावंत, रितेश कापडणीस, गोपी कापडणीस, संदीप कापडणीस. हितेंद्र कापडणीस यांनी केली आहे. (वार्ताहर)