माथाडींच्या संपाने धान्य उचल बंद
By Admin | Updated: February 25, 2015 00:39 IST2015-02-25T00:38:55+5:302015-02-25T00:39:06+5:30
माथाडींच्या संपाने धान्य उचल बंद

माथाडींच्या संपाने धान्य उचल बंद
नाशिक : माथाडी कामगारांनी सोमवारपासून पुकारलेल्या बेमुदत संपाचा फटका पुरवठा विभागाला बसला असून, दोन दिवसांपासून धान्याची उचल ठप्प झाली आहे. त्याचा परिणाम सार्वजनिक वितरण प्रणालीवर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात असला तरी, त्याला यश मिळालेले नाही. शासकीय धान्याची वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराशी नवीन करार करावा, माथाडी महामंडळाने ठरवून दिलेल्या दरानुसार हमाली द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी सोमवारपासून राज्य माथाडी कामगार जनरल युनियनने बेमुदत संप पुकारून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले आहे. अन्नधान्य महामंडळातून वाहतूक केले जाणारे व शासकीय गुदामात धान्य उतरविणारे शेकडो कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून धान्याची उचल पूर्णत: बंद झाली आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार पुढच्या महिन्याचे धान्य आदल्या महिन्यातच अन्नधान्य महामंडळाकडून उचलण्याचे बंधनकारक करण्यात आलेले असून, साधारणत: महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच ही कार्यवाही केली जाते. त्यामुळे या संपामुळे धान्य उचलणे बंद झाले आहे. दरम्यान, वाहतूक ठेकेदाराशी नव्याने करार करण्याची प्रक्रिया पुरवठा विभागाकडून सुरू असून, माथाडी कामगारांनी आंदोलन मागे घ्यावे, यासाठी सायंकाळपर्यंत प्रयत्न केले जात होते.