सवंदगाव फाट्यावर ट्रक खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:50 IST2020-02-12T22:52:30+5:302020-02-12T23:50:13+5:30
मालेगाव मध्य : म्हाळदे शिवारातील सवंदगाव फाट्याजवळ सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ट्रकला आग लागून ट्रकमधील माल जळून खाक झाला. ...

मालेगावनजीक संवदगाव फाट्यावर ट्रकला लागलेली आग.
मालेगाव मध्य : म्हाळदे शिवारातील सवंदगाव फाट्याजवळ सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ट्रकला आग लागून ट्रकमधील माल जळून खाक झाला. मनपाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन बंबाच्या साहाय्याने आग विझवली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात जळालेल्या ट्रकसंदर्भात तक्रार देण्यास कुणीच आले नसल्याने याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
महामार्गावरील सवंदगाव फाट्याजवळ लबैक हॉटेल येथे सकाळी मुंबईहून धुळ्याच्या दिशेने जाणारा ट्रक (क्र.एमएच ०४ ईवाय ८७७७) उभ्या असलेल्या ट्रकला आग लागल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी सदर घटनेची माहिती मनपाच्या अग्निशमन केंद्रास दिली.
अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन बंबाद्वारे चार फेऱ्या करीत आगीवर नियंत्रण मिळविले. ट्रकमध्ये ट्रान्स्पोर्टचा विविध प्रकारचा माल व ट्रक जळून मोठे नुकसान झाले. मात्र या जळालेल्या ट्रकसंदर्भात सायंकाळपर्यंत कोणीही संपर्क साधला नसल्याने नुकसानीचा निश्चित आकडा मिळू शकला नाही. सायंकाळपर्यंत पवारवाडी पोलीस ठाण्यात याबाबत कुठलीच नोंद घेण्यात आली नव्हती.