इगतपुरी : मुंबई-आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटात नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा ट्रक शुक्रवारी (दि. ६) पहाटे चारच्या सुमारास १०० फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात १ जागीच ठार झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन टीमच्या तरुणांनी मयत व जखमींना दरीच्या बाहेर काढून रुग्णालयात पाठविले.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटात नाशिकहून मुंबईच्या दिशेने बॉटल घेऊन जाणारा मालवाहू ट्रकचा ( क्रमांक एमएच १२ एच. डी. ८३५५ ) ब्रेक घाटात फेल झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रक थेट १०० फूट दरीत कोसळला.
या अपघाताची माहिती आपत्ती व्यवस्थापन टीमचे प्रमुख श्याम धुमाळ यांना समजताच त्यांनी आपल्या टीमच्या सहकाऱ्यांना घेऊन घटनास्थळी अंधारात १०० फूट खोल दरीत उतरून मदतकार्य सुरू केले. भर पावसात पहाटे ४ ते सकाळी ७ वाजेपर्यंतच्या अथक् प्रयत्नाने, गंभीर असलेल्या ३ जखमींना सुखरूप बाहेर काढण्यात आले, तर वाहनचालक गोकुळ शिवाजी बोडके (वय ३१, रा. नाशिक रोड) याचा जागीच मृत्यू झाल्याने त्याचा मृतदेह कसारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला.
इन्फो
तिघांना वाचविण्यात यश
आपत्ती व्यवस्थापन टीमचे प्रमुख श्याम धुमाळ, मनोज मोरे, दत्ता वाताडे, अक्षय राठोड, विनोद आयरे, लक्ष्मण वाघ, देवा वाघ, जस्सी, बाळू मांगे यांच्यासह टोल प्लाझाचे कर्मचारी व महामार्ग सुरक्षा पोलीस पथक यांनी ३ तास अथक् प्रयत्न करून अपघातात जखमी झालेले अमित चंद्रकांत कुलकर्णी, योगेश संजय पाडळे व शिवा (पूर्ण नाव माहीत नाही) सर्व राहणार नाशिकरोड येथील असून त्यांना वाचविण्यात आपत्ती व्यवस्थापन टीमला यश आले. त्यांना उपचारासाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.