सारदे रस्त्यावर दोन विद्यार्थिनींना ट्रकची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:55 IST2018-05-13T00:54:26+5:302018-05-13T00:55:12+5:30
सारदे रस्त्यावर शेणखताने भरलेल्या ट्रकने दोन मुलींना चिरडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. एका मुलीवर मालेगाव येथे तर दुसऱ्या मुलीची प्रकृती गंभीर असल्याने नाशिक येथे उपचार सुरू आहेत. वायगावजवळ झालेल्या भीषण अपघातामुळे काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दंगा नियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आले होते.

सारदे रस्त्यावर दोन विद्यार्थिनींना ट्रकची धडक
सटाणा : सारदे रस्त्यावर शेणखताने भरलेल्या ट्रकने दोन मुलींना चिरडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. एका मुलीवर मालेगाव येथे तर दुसऱ्या मुलीची प्रकृती गंभीर असल्याने नाशिक येथे उपचार सुरू आहेत. वायगावजवळ झालेल्या भीषण अपघातामुळे काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दंगा नियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आले होते.
वायगाव येथील कल्याणी सीताराम कापडणीस (१६) व भाग्यश्री नीलेश बोरसे (१६) या दोघी मैत्रिणींनी नुकतीचदहावीची परीक्षा दिली आहे. सुटीच्या दिवसात त्यांनी नामपूर येथे संगणक क्लास लावला. नेहमीप्रमाणे कल्याणी व भाग्यश्री बाळू शेवाळे यांच्या शेताजवळील वायगाव-सारदे रस्त्यावर शुक्रवारी (दि.११) सकाळी नामपूरला जाण्यासाठी वाहनाच्या प्रतीक्षेत रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाखाली बसल्या होत्या. काही वेळातच रस्त्याची परिस्थिती न बघता नामपूरहून शेणखत भरलेल्या ट्रकने त्यांना धडक दिली. दोघीही चाकाखाली सापडल्या. यात कल्याणी कापडणीस हिचे दोन्ही पाय कायमस्वरूपी निकामी झालेत तर भाग्यश्रीचा एक पाय निकामी झाला. तसेच अंगावर काही ठिकाणी जखमा झाल्या आहेत. अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही मुलींना चिरडून ट्रक थेट झाडावर आदळला, यामुळे ट्रकचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आजूबाजूला राहणारे शेतकरी व गावातील ग्रामस्थांनी धाव घेत मुलींना तातडीने रुग्णालयात हलविले; मात्र कल्याणीची प्रकृती गंभीर असल्याने तिला नाशिक येथे हलविण्यात आले आहे. भरधाव ट्रक चालविणारा ट्रकचालक फैजानखान करीमखान पठाण (रा. जायखेडा, ता. बागलाण) याला पोलिसांनी अटक केली आहे. जायखेडा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामस्थ संतप्त
संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांना जागेवरून ट्रक हलवू देणार नाही अशी ठाम भूमिका घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत शिंदे व जायखेडा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक सतीश गावित यांनी घटनास्थळी भेट दिली व नागरिकांची समजूत घातली. यावेळी काही विपरीत घटना घडू नये यासाठी दंगा नियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आले होते.