त्र्यंबकला वीज वितरणची कामे अद्याप प्रलंबित
By Admin | Updated: July 19, 2015 22:38 IST2015-07-19T22:36:00+5:302015-07-19T22:38:24+5:30
विजेचा खेळखंडोबा

त्र्यंबकला वीज वितरणची कामे अद्याप प्रलंबित
त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ पर्वकालही सुरू झाला आहे, आखाड्यांचे ध्वजारोहण, पेशवाई मिरवणुका यांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत; पण वीज वितरण कंपनीचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच आहे. वीज खंडित होण्याचे प्रकार सुरूच असून, अद्याप कामे पूर्ण झालेली नाहीत. ही सर्व कामे अपूर्ण राहिली तर ऐन सिंहस्थ पर्वणीत कसे होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़
खास सिंहस्थासाठी त्र्यंबकेश्वरला रोहित्र संच, नवीन मशिनरी, सातपूर, अंबड व खंबाळे येथून आलेल्या वाहिन्या, गावात हायमास्ट लावून लखलखाट होणार आहे. मला अंधार नको सर्वत्र लखलखाट असला पाहिजे असे खुद्द राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनीच म्हटले होते. त्याप्रमाणे वीज वितरण कंपनी युद्धपातळीवर काम करत आहे़ कर्मचारी केव्हाही फॉल्ट शोधण्यासाठी लाइनवर असतात. मग माशी शिंकते कोठे? विजेचा खेळखंडोबा सुरूच आहे. वीज खंडित झाल्यामुळे सर्वात मोठा परिणाम पाण्यावर होतो.
पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत़ सध्याही दोन दोन मिनिटाला लाईट जाणे, परत येणे, लुक लुक करणे आदि प्रकार सुरूच असतात. काही कर्मचारी सब स्टेशनवरचे आॅपरेटर्स फोन बंद ठेवतात. पर्वणी काळात असे होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (वार्ताहर)