माहेरघर असलेल्या त्र्यंबकेश्वरी यंदा पावसाची अवकृपा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:17 IST2021-09-07T04:17:33+5:302021-09-07T04:17:33+5:30
त्र्यंबकेश्वर : तालुका तसा पावसाचे माहेरघर समजला जातो. या तालुक्यात ४००० ते ५००० मि.मी. पाउस पडतो. अर्थात, पावसाची सरासरी ...

माहेरघर असलेल्या त्र्यंबकेश्वरी यंदा पावसाची अवकृपा
त्र्यंबकेश्वर : तालुका तसा पावसाचे माहेरघर समजला जातो. या तालुक्यात ४००० ते ५००० मि.मी. पाउस पडतो. अर्थात, पावसाची सरासरी २५०० मि.मी. आहे. या वर्षी मात्र जुलै महिन्यात पुष्य नक्षत्रात जेवढा पाऊस पडला, त्यानंतर मात्र एकदाही पावसाच्या नक्षत्रात पाऊस पडला नाही. पुष्य नक्षत्राने महाराष्ट्राच्या काही भागांत नद्यांना आलेल्या महापुराने अनेक ठिकाणी नुकसानी झाल्या. वित्तहानी, प्राणहानी झाली होती. पण, तरीही त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमीच आहे.
त्र्यंबकला रिमझिम स्वरुपात का होईना पण पावसाचे सातत्य आहे. थोडीफार विश्रांती तर अधूनमधून पावसाची हजेरी लागत असल्याने भाताच्या पिकांचे नुकसान होत नाही. त्यामुळे भातपीक सध्या तरी जोमदार आहे. सध्या पूर्वा नक्षत्र असूनही इतरत्र पावसाची दमदार हजेरी लागत आहे. पण, त्र्यंबकेश्वर तालुक्यात दहा मि.मी.पेक्षा जास्त पावसाची हजेरी लागत नाही. असे असूनही सूर्यदर्शन दुर्मीळ झाले आहे. त्र्यंबकेश्वर शहरात अनेक घरांत चिकुनगुन्याची साथ आहे. हे केवळ कमी पावसामुळे होत आहे. जोरदार पाऊस आला तर निदान वातावरण तरी निवळेल. पालिका मात्र डासांसाठी काहीच उपाययोजना करत नाही. शहरात डासांचे साम्राज्य वाढले आहे. एकंदरीत यावर्षीचा पाऊस पीक परिस्थितीला उत्तम असला, तरी मानवाच्या शरीर प्रकृतीला बाधक असल्याचे बोलले जात आहे.