त्र्यंबकेश्वरचा प्लांट बारगळला; दिंडोरीचा पेठला स्थलांतरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:17 IST2021-09-07T04:17:51+5:302021-09-07T04:17:51+5:30
नाशिक : कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्यामुळे नाशिक जिल्ह्यात मागील दोन महिन्यांच्या तुलनेत आता त्र्यंबकेश्वर, पेठ, सटाणा आणि ...

त्र्यंबकेश्वरचा प्लांट बारगळला; दिंडोरीचा पेठला स्थलांतरित
नाशिक : कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्यामुळे नाशिक जिल्ह्यात मागील दोन महिन्यांच्या तुलनेत आता त्र्यंबकेश्वर, पेठ, सटाणा आणि दिंडोरी तालुका वगळता अन्य तालुक्यांतील ऑक्सिजन प्लांटची कामे जवळजवळ अंतिम टप्प्यात आली आहेत. दोन दिवसांपूर्वीच इगतपुरी तालुक्यातील ऑक्सिजन प्लांट पूर्ण झाला व त्याचे समारंभपूर्वक लोकार्पण करण्यात आले. मालेगाव आणि येवला या तालुक्यांत पहिल्या टप्प्यातच ऑक्सिजन प्लांटची उभारणी करून प्लांट यापूर्वीच कार्यान्वित झाले आहेत. मात्र, त्र्यंबकेश्वर येथील प्लांट मात्र बारगळल्यातच जमा आहे.
दिंडोरी तालुक्यात होणारा ऑक्सिजन प्लांंट पेठ तालुक्यात स्थलांतरित करण्यात आला असून, एच.ए.एल. त्याची उभारणी करणार आहे. मात्र, त्याबाबत अद्याप काहीच हालचाल नसल्याचे सांगण्यात आले.
त्र्यंबकेश्वरचा ऑक्सिजन प्लांट बारगळल्यात जमा आहे. जून महिन्यात प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार दीपक गिरासे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्रांताधिकाऱ्यांच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून ऑक्सिजन प्लांट आम्ही देतो असे ठोस आश्वासन श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे देण्यात आले होते. त्यानंतर देवस्थानने कुठलीही हालचाल केलेली नाही. आमदार खोसकर यांनी नंतर ऑक्सिजन प्लांट मंजूर करून आदिवासी उपयोजनेतून निधीही मंजूर करून घेऊन प्रत्यक्षात प्लांटही तयार झाला आहे. आता फक्त वीज जोडणी व ऑक्सिजन प्लांटसाठी शेड बांधणे बाकी आहे,
तर त्र्यंबकसाठी सीएसआरमधून इंडिया सिक्युरिटी प्रेसवर ऑक्सिजन प्लांट उभारण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती; पण इंडिया सिक्युरिटी प्रेस केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयाच्या कार्यकक्षेत असल्याने अर्थमंत्रालयाची मंजुरी मिळणे आवश्यक असल्याने आयएसपीने ऑक्सिजन प्लांट प्रकरण दिल्लीला मंजुरीसाठी पाठविले. मात्र, अर्थमंत्रालयाकडून प्रकरण नामंजूर झाल्याने त्र्यंबकेश्वर येथील ऑक्सिजन प्रकल्प बारगळला आहे.
इन्फो
नगरसूलचे ७५ टक्के काम पूर्ण
येवला येथील उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण झालेले असून, हा प्लांट सुरू आहे. नगरसूल येथील ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटचे सुमारे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. वीज, मीटर व इतर कामे बाकी असून, ही कामेही लवकरच होणार आहेत.
देवळा तालुक्यातील उमराणा व देवळा येथील ग्रामीण रुग्णालयांसाठी मंजूर झालेल्या ऑक्सिजन प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, आठवडाभरात चाचणी घेण्यात येणार आहे. जळगाव येथील जयलक्ष्मी एंटरप्रायजेस कंपनीने ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले आहे. हवेतून ऑक्सिजन जमा करणाऱ्या या प्रकल्पात दररोज ६० ते ७० जम्बो सिलिंडर भरतील इतका ऑक्सिजन एका प्रकल्पातून मिळणार आहे. प्रकल्पासाठी ५२ केव्ही क्षमतेचे रोहित्र उभारण्यात आले असून, वीज वितरण कंपनीचे मीटर बसविण्याचे काम बाकी आहे.
इन्फो
कळवणला लवकरच प्लांट
हरसूल येथील प्लांट संथ गतीने उभारण्यात येत होता. आता मशिनरी जोडली गेली असून, केवळ वीज जोडणीचे काम बाकी आहे. ते लवकरच पूर्ण केले जाणार आहे. कळवण तालुक्यातील ऑक्सिजन प्लांट सावकाश केला जात होता. आता तो ९० टक्के पूर्ण झाला असून, पुढील आठवड्यात तो कार्यान्वित केला जाणार आहे.
सुरगाणा या आदिवासी तालुक्यात मागील महिन्यापर्यंत कामच सुरू नव्हते. आता ते पूर्ण झाले असून, पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असल्याने येत्या १०/१२ दिवसांत प्रकल्प उभा राहणार आहे.
050921\190905nsk_40_05092021_13.jpg
चांदवड येथील उभा राहिलेला प्रकल्प.