त्र्यंबकला सफाई कामगारांच्या नेत्यांविरूद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 01:03 IST2021-04-07T22:07:29+5:302021-04-08T01:03:29+5:30
त्र्यंबकेश्वर : येथील नगरपरिषदेचे कंत्राटी सफाई कामगार 'प्रहार' संघटनेच्या नेत्यांसमवेत आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी मुख्याधिकारी संजय जाधव यांच्या कार्यालयात गेले ...

त्र्यंबकला सफाई कामगारांच्या नेत्यांविरूद्ध गुन्हा दाखल
त्र्यंबकेश्वर : येथील नगरपरिषदेचे कंत्राटी सफाई कामगार 'प्रहार' संघटनेच्या नेत्यांसमवेत आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी मुख्याधिकारी संजय जाधव यांच्या कार्यालयात गेले असता, जाधव व संघटनेचे नेते यांच्यात शाब्दिक चकमक झडली. त्यानुसार, सरकारी कामात अडथळा आणला, म्हणून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यात सफाई कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संघटनेचे नेते नानासाहेब शिवराम दोंदे ( रा.त्र्यंबकेश्वर), अनिल कोंडाजी भडांगे (रा.क्रांतिनगर, नाशिक), राम शिवराम दोंदे व विजय सुरकेश सोयर (रा.त्र्यंबकेश्वर), तसेच नितीन शंकर गवळी (रा.वाडीवऱ्हे) हे पाच नेते असून, यामध्ये सफाई कामगारांचे तीन कर्मचारी युनियन पदाधिकारी आहेत. त्यांनी मुख्याधिकारी यांच्या दालनात जाण्याचा प्रयत्न केला असता, तेथील महिला शिपाई यांनी ह्यसाहेबांची व्हिडीओ कॉन्फरन्स मीटिंग सुरू असून, तुम्ही नंतर या,ह्ण असे सांगितले. याचा राग आल्याने हे पाचही जण मुख्याधिकारी यांच्या दालनात घुसले. मुख्याधिकारी यांनी कोरोना कोविडची सद्यस्थिती शहरात बिकट असून, तुम्ही माझी मीटिंग संपू द्या, मग सविस्तर चर्चा करू,ह्ण असे सांगितले, परंतु संबंधित नेत्यांनी मुख्याधिकारी यांना अपशब्द वापरल्याने पाच जणांविरुद्ध त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गावात कचऱ्याचे साम्राज्य
त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेचा सफाईचा ठेका ३१ मार्चला संपला आहे, तेव्हापासून गावात कचऱ्याचे साम्राज्य वाढले आहे. आधीच गावात कोरोनाचा कहर असून, त्यात कचऱ्याचे साम्राज्य असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. सद्यस्थितीत ६०च्या आसपास कंत्राटी कर्मचारी आहेत. नगरपरिषदेने गावातीलच एका ठेकेदारास ठेका मंजूर केला, पण संबंधित ठेकेदाराचा परवाना अवघा तीस लोकांचा आहे, परंतु संघटनेकडून सर्व सफाई कामगारांना कामावर घेण्याची मागणी केली जात आहे. त्याच मागणीसाठी संघटनेचे पदाधिकारी ते मुख्याधिकारी यांच्या कडे गेले होते, परंतु वाद होऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.