त्र्यंबकच्या सौंदर्याची पर्यटकांना भुरळ
By Admin | Updated: July 4, 2017 23:38 IST2017-07-04T23:26:29+5:302017-07-04T23:38:46+5:30
नाशिक : पावसाळा सुरू झाला की, सहलींचे बेत आखले जातात.

त्र्यंबकच्या सौंदर्याची पर्यटकांना भुरळ
नाशिक : पावसाळा सुरू झाला की, सहलींचे बेत आखले जातात. पावसाळी पर्यटनाची संधी जवळपास कोणीही दवडू देत नाही, कारण पावसाळ्यात बहरणाऱ्या निसर्गसौंदर्याची मोहिनी प्रत्येकालाच पडते. हिरव्यागार वसुंधरेच्या कुशीत वसलेल्या डोंगरांनाही हिरवा साज चढलेला असतो आणि ढग जणू त्यांच्या भेटीसाठी आतूर होऊन डोंगरांना आपल्या कवेत घेत असल्याचा भास होतो.
पावसाच्या सरींमुळे हिरवाईने नटलेल्या डोंगरांवरून खळाळणाऱ्या धबधब्यांमुळे सौंदर्यात अधिकच भर पडते. आजूबाजूला वाहणारे ओहोळ, तलाव, नाले जोरदार थंडगार वारा आणि पावसाच्या कोसळणाऱ्या सरी अंगावर झेलत आल्हाददायक वातावरणात चिंब होण्याचा मोह निसर्गप्रेमी आवरू शकत नाही. पहिने-पेगलवाडी गावांचा परिसर न्याहाळताना पर्यटकांच्या डोळ्यांची पारणे फिटत आहे. त्र्यंबक- घोटी रस्त्यावरील घाटातून मार्गस्थ होताना ही गावे लागतात. आजूबाजूला पसरलेल्या हरित सौंदर्यामध्ये गावातील टुमदार कौलारू घरे जणू एखाद्या चित्रकाराने कुंचल्यातून कॅन्व्हासवर साकारलेले चित्रच भासते.