त्र्यंबकला उभारावा खत प्रकल्प

By Admin | Updated: August 13, 2014 00:43 IST2014-08-12T23:16:08+5:302014-08-13T00:43:58+5:30

गोदावरी प्रदूषण : हरित न्यायाधिकरणाने दिले आदेश

Trilogy Raised Manure Project | त्र्यंबकला उभारावा खत प्रकल्प

त्र्यंबकला उभारावा खत प्रकल्प

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीतील प्रदूषण टाळण्यासाठी पूजाविधीचे निरुपयोगी साहित्य तसेच निर्माल्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणारा प्रकल्प उभारावा व तोपर्यंत तेथील कचरा नाशिक महापालिकेच्या खत प्रकल्पात पाठविण्याचे आदेश पुणे येथील हरित न्यायाधिकरणाने दिले आहेत.
त्र्यंबकेश्वरी गोदावरी नदीवरील कॉँक्रीटचा स्लॅब काढण्याच्या मागणीसाठी येथील ललिता शिंदे, राजेश पंडित आणि निशिकांत पगारे यांनी पुण्याच्या न्यायाधिकरणात याचिका दाखल केली असून, त्यावरील सुनावणीच्या दरम्यान हे आदेश देण्यात आले आहेत. त्र्यंबकेश्वर येथे पूजाविधीचे वापरलेले साहित्य तसेच निर्माल्य नदीपात्रात जात असल्याने त्यावर नाशिक महापालिकेच्या खत प्रकल्पात त्याची विल्हेवाट लावण्यासाठी परवानगी घ्यावी अशा सूचना यापूर्वी न्यायाधिकरणाने दिल्या होत्या; मात्र महापालिकेने त्यास नकार दिला होता. त्यानंतर मंगळवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायाधिकरणाने त्र्यंबकेश्वर येथेच कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणारा प्रकल्प राबविण्याचे आदेश दिले. कचऱ्याचे वहन आणि अन्य खर्च येथील पुरोहित संघाकडून घ्यावा आणि त्यांनी टाळल्यास त्यांना शासकीय जागेचा धार्मिक विधीसाठी वापर करण्यास मनाई करता येऊ शकते, असेही न्यायाधिकरणाने सांगितल्याचे याचिकाकर्ता पंडित यांनी सांगितले. त्र्यंबक पालिकेला प्रकल्प राबविण्यासाठी लागणाऱ्या कालावधीचा विचार करता तोपर्यंंत हा कचरा नाशिक महापालिकेच्या खत प्रकल्पावर विल्हेवाट लावण्यासाठी द्यावा, असेही न्यायाधिकरणाने आदेश दिले आहेत. यासंदर्भातील पूर्तता अहवाल सादर करण्यासही नगरपालिकेस सांगण्यात आले आहे. दरम्यान, कॉँक्रिटीकरणाचा मूळ मुद्दा अद्याप बाकी असून, त्यावर पुढील तारखेस सुनावणी होणार आहे.

Web Title: Trilogy Raised Manure Project