आदिवासी सदस्य आज पालकमंत्र्यांना भेटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:36 IST2021-02-05T05:36:58+5:302021-02-05T05:36:58+5:30
नाशिक जिल्ह्यात आठ तालुके आदिवासी असून, या तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग तयार करणे व दुरुस्त करण्याकामी सन २०१९-२० या ...

आदिवासी सदस्य आज पालकमंत्र्यांना भेटणार
नाशिक जिल्ह्यात आठ तालुके आदिवासी असून, या तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग तयार करणे व दुरुस्त करण्याकामी सन २०१९-२० या वर्षासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. तथापि, तरतुदीपेक्षाही अधिक रकमेच्या कामांना बांधकाम विभागाने प्रशासकीय मान्यता यापूर्वीच देऊन ठेवल्याने एकूण तरतुदीपेक्षा मागचे दायित्व देण्यासाठी निधीची कमतरता भासू लागली आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास आणखी दोन वर्षे आदिवासी भागात रस्त्यांची कामे होणार नाही, अशी भावना व्यक्त केली जात आहे. मध्यंतरी आदिवासी तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यांनी एकत्र येत, प्रशासनाकडे जाऊन अतिरिक्त प्रशासकीय मान्यता रोखण्याची मागणी केली होती. त्याच वेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेण्याचेही ठरविण्यात आले होते. आता मात्र, शनिवारी जिल्हा नियोजन मंडळाची बैठक भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, त्यात सन २०२१-२२चा आराखडा सादर केला जाणार आहे, तसेच सन २०२०-२१च्या खर्चाचा ताळामेळही घेतला जाणार असल्याने, कोरोनामुळे अखर्चित राहिलेला इतर विभागाचा निधी आदिवासी तालुक्यांना मिळावा, यासाठी पदाधिकारी व सदस्य प्रयत्नशील आहेत. त्यासाठी शनिवारी सकाळी भुजबळ यांच्या निवासस्थानी ही भेट होणार आहे.