तपोवनातील साधूवर स्वाइन फ्लू कक्षात उपचार
By Admin | Updated: September 4, 2015 00:05 IST2015-09-04T00:05:01+5:302015-09-04T00:05:21+5:30
तपोवनातील साधूवर स्वाइन फ्लू कक्षात उपचार

तपोवनातील साधूवर स्वाइन फ्लू कक्षात उपचार
नाशिक : शहरात स्वाइन फ्लूने डोके वर काढण्यास सुरुवात केली असून, तपोवनातील एका साधूवर जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात उपचार सुरू आहेत़ दरम्यान, या कक्षात सात रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यापैकी एकाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़ गत आॅगस्टमध्ये जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे़ त्यातच तपोवनातील एका साधूवर उपचार सुरू असल्याने घबराट पसरली आहे़
जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात सद्यस्थितीत सात रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यामध्ये चार पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे़ महिलांमध्ये अकोल्याहून आलेल्या एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह असून, पंचवटीतील साधुग्राममधील साधूंचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही़ गत महिन्यात जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू संशयित सुमन दगू सोळसे (५३, पंचशीलनगर), राजेंद्र शिवराम शिंदे (३५, दोडी बुद्रुक, सिन्नर), शांताबाई अर्जुन देवकर (७०, पाथर्डी फाटा), नीलिमा चुडामण पानडवळे (सावरपाडा, ता़पेठ) यांसह तिघांचा समावेश आहे़
नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थासाठी भाविक येत आहेत़ साधू-महंतांचे दर्शन तसेच पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी शहरासह परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने गंगाघाट तसेच साधुग्राम, त्र्यंबकेश्वरला भेट देत असल्याने गर्दीत भर पडते आहे़ त्यातच संसर्गजन्य अशा स्वाइन फ्लूचा प्रभाव वाढला तर याचा वेगाने फैलाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.