विविध रुग्णालयांत ३५ स्वाइन फ्लू संशयितांवर उपचार

By Admin | Updated: March 28, 2017 01:36 IST2017-03-28T01:35:53+5:302017-03-28T01:36:14+5:30

नाशिक : स्वाइन फ्लू रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, ग्रामीण भागामध्ये या रोगाचा फैलाव होण्याचे प्रमाण वाढते आहे़

Treatment on 35 Swine Flu suspects in various hospitals | विविध रुग्णालयांत ३५ स्वाइन फ्लू संशयितांवर उपचार

विविध रुग्णालयांत ३५ स्वाइन फ्लू संशयितांवर उपचार

नाशिक : स्वाइन फ्लू रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, ग्रामीण भागामध्ये या रोगाचा फैलाव होण्याचे प्रमाण वाढते आहे़ सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षामध्ये नऊ, तर महानगरपालिका हद्दीतील खासगी रुग्णालयांमध्ये २६ अशा ३५ रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत १५ नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ सुरेश जगदाळे यांनी दिली़ जिल्ह्णात तपमानाचा जोर वाढत असतानाच स्वाइन फ्लूचा फैलावही वाढत चालला आहे़ जानेवारी ते २७ मार्च या कालावधीत जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद व महापालिका हद्दीतील ३९ हजार ३०३ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये ६३ नागरिकांना स्वाइन फ्लू असल्याचे निदान झाले आहे.तर प्राथमिक तपासणीमध्ये संशयित ३०७ रुग्णांना टॅमी फ्लूची औषधे देण्यात आली आहेत़  सोमवारी (दि़२७) तपासणी करण्यात आलेल्या ३५६ रुग्णांपैकी २७ रुग्णांना टॅमी फ्ल्यूची औषधे सुरू करण्यात आली आहेत़ जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात ९ संशयितांवर उपचार सुरू असून, त्यापैकी २ रुग्ण पॉझिटीव्ह आहेत़ तर महापालिका हद्दीतील विविध रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या २६ रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत़ दरम्यान, जिल्हा रुग्णालयात सिन्नर तालुक्यातील एक नवीन रुग्ण दाखल झाला आहे़ (प्रतिनिधी)
शेड्युल एच १ मध्ये टॅमी फ्लू
स्वाइन फ्लूसाठी वापरण्यात येणाऱ्या टॅमी फ्लूच्या गोळ्या या शेड्युल एच १ मध्ये टाकण्याची विनंती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ सुरेश जगदाळे यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त पाटील यांच्याकडे केली आहे़ या गोळ्या सर्व मेडिकलमध्ये उपलब्ध व्हाव्यात, यासाठी हा निर्णय घेणे आवश्यक आहे़ सद्यस्थितीत काहीच मेडिकलमध्ये या गोळ्या उपलब्ध आहेत़ तर डॉक्टरांकडून या गोळ्या लिहून दिल्या जात नसल्याने हा स्टॉक तसाच पडून राहण्याच्या भीतीमुळे काही मेडिकलचालक ही औषधे ठेवत नसल्याचे समोर आले आहे़

Web Title: Treatment on 35 Swine Flu suspects in various hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.