पावणेदोनशे वर्षांपूर्वीच्या दगडी शाळेचा लोकसहभागातून कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:15 IST2021-09-26T04:15:32+5:302021-09-26T04:15:32+5:30
चांदवड शहरातील सगळ्यात पहिली ही जिल्हा परिषदेची शाळा आहे. सन १८४५ मध्ये सुरू झालेल्या शाळेत गेल्या पावणेदोनशे वर्षांमध्ये ...

पावणेदोनशे वर्षांपूर्वीच्या दगडी शाळेचा लोकसहभागातून कायापालट
चांदवड शहरातील सगळ्यात पहिली ही जिल्हा परिषदेची शाळा आहे. सन १८४५ मध्ये सुरू झालेल्या शाळेत गेल्या पावणेदोनशे वर्षांमध्ये हजारो विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिकून गेल्या. अनेक जण मोठमोठ्या पदांवर आज विराजमान आहेत. शाळेला फार मोठा ऐतिहासिक वारसा आहे. पूर्वी रंगमहालात भरणारी ही शाळा आता नगर परिषद जवळ असलेल्या इमारतीत दगडी शाळा म्हणून ओळखली जाते. गेल्या पावणेदोनशे वर्षांमध्ये या शाळेने अनेक स्थित्यंतरे बघितली. स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेली ही शाळा त्यावेळी चांदवड गावातील एकमेव शिक्षणाचे माध्यम होते. काळाच्या ओघात चांदवड शहरात अनेक नवनवीन शाळा सुरू झाल्या. खासगी शाळांची संख्या वाढल्यामुळे या जिल्हा परिषदेच्या शाळेकडे स्पर्धेच्या युगात अनेकांनी पाठ फिरवली. त्यामुळे पटसंख्या रोडावली. भौतिक सुविधांचा अभाव यामुळे पालकांची नकारात्मक भूमिका तयार झाली. त्यामुळे शाळा विकासाच्या दृष्टीने मागे पडत गेली. शाळेकडे दुर्लक्ष झाल्याने पडीत इमारत, पावसाळ्यात नकोसा वाटणारा शाळेचा आवार, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृह यांचा अभाव या सगळ्या गोष्टींमुळे शाळा बंद पडते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. अशी परिस्थिती असताना शाळेचे माजी विद्यार्थी संदीप महाले यांची या शाळेत बदली झाली. त्यांनी शाळेतील सहकारी शिक्षक, शाळेचे माजी विद्यार्थी, गावातील शिक्षणप्रेमी यांची सांगड घालून गेल्या काही दिवसांत शाळेचा पूर्णत: कायापालट केला. गोरगरिबांच्या मुलांनाही अत्याधुनिक पद्धतीने शिक्षण मिळावे तसेच सर्व मुलांना भौतिक सुविधा मिळाव्यात यासाठी महाले व शिक्षणप्रेमी माजी विद्यार्थी या सर्वांनी शाळेच्या विकासासाठी मोठा निधी लोकवर्गणीतून उभा केला व शाळा पुन्हा जोमाने पूर्वनावलौकिक मिळवण्यासाठी सज्ज झालेली आपल्याला दिसते.
जीर्ण झालेल्या वर्गखोल्यांची दुरुस्ती, डिजिटल क्लासरूम, मुला-मुलींसाठी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्यार्थी कलामंच, संगणक कक्ष, कलादालन, प्रयोगशाळा या सर्व बाबी शाळेचे मुख्याध्यापक संदीप महाले यांनी लोकसहभागातून उभ्या केल्या. आज शाळेने पूर्णत: कात टाकून नवीन रूप धारण केले आहे. शाळेचे बदललेले रूप आणि शिक्षकांचे प्रयत्न यामुळे मुलांची शाळेकडे ओढ वाढली व आज शंभर टक्के पटनोंदणी, शंभर टक्के उपस्थिती, शैक्षणिक गुणवत्ता विकास यासारख्या बाबी शाळा पूर्ण करत आहे. कोरोनाच्या काळामध्ये शाळेतील शिक्षक ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. संदीप महाले व शाळेतील शिक्षक यांची शाळेविषयीची आत्मीयता, तळमळ बघून इंग्लिश मीडिअमच्या मुलांनीही या शाळेत प्रवेश घेतला आहे. शाळेच्या या बदलत्या स्वरूपास मूर्त स्वरूप देण्यासाठी महाले यांनी शाळेत विविध उपक्रम राबविले. माजी विद्यार्थी मेळावा, महिला मेळावा, थोरांच्या जयंती व पुण्यतिथी कार्यक्रमात जनतेचा सहभाग, त्याचप्रमाणे गावातील नागरिकांचा वाढदिवस साजरा करून शाळेला खूप मोठी अशा स्वरूपाची मदत मिळवली. गेल्या चार वर्षांत आजपर्यंत जवळजवळ नऊ लाख रुपयांची मदत रोख व वस्तुरूपात मदत मिळवली. आज चांदवड शहरात इतर शाळांच्या स्पर्धेत वाटचाल करताना ही शाळा आपल्याला दिसते. यापुढेही असेच कार्य करून शाळेची पटसंख्या वाढविणे, त्याचप्रमाणे शाळेमध्ये सेमी इंग्रजी अभ्यासक्रम सुरू करणे, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी कलादालन समृद्ध करणे, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी प्रयोगशाळा अद्ययावत करणे, तसेच संगणक कक्ष कलामंच यासारखे विविध उपक्रम महाले यांच्या पुढाकाराने शाळेने सुरू केले आहेत. शाळेतील शिक्षकांच्या या कार्याची दखल सामाजिक संस्थांनीदेखील घेतलेली असून, शाळेतील शिक्षकांना सेवा प्रतिष्ठानचा पुरस्कार तसेच शाब्बास गुरुजी पुरस्कारही प्राप्त झालेला आहे.
फोटो- २५ चांदवड महाले
----------------------------------------------------------------------
फोटो- २५ चांदवड स्कूल-१
चांदवड येथील सर्वात जुन्या जिल्हा परिषदेच्या शाळेची पूर्वीची अवस्था.
------------------------------------------------------
फाेटो- २५ चांदवड स्कूल-२
चांदवड येथील सर्वात जुन्या जिल्हा परिषदेच्या शाळेचा शिक्षक संदीप महाले यांनी केलेला कायापालट.
250921\25nsk_20_25092021_13.jpg~250921\25nsk_21_25092021_13.jpg~250921\25nsk_22_25092021_13.jpg
फोटो- २५ चांदवड महाले~फोटो- २५ चांदवड स्कूल-१~फाेटो- २५ चांदवड स्कूल-२