नाशिक महापालिकेतील ४७८ सफाई कर्मचा-यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 18:36 IST2018-02-22T18:34:49+5:302018-02-22T18:36:57+5:30
महापालिका : लोकसंख्येनुसार विभागनिहाय नियोजन
नाशिक महापालिकेतील ४७८ सफाई कर्मचा-यांच्या बदल्या
नाशिक - शहरातील सहाही विभागात सफाई कामगारांच्या संख्येबाबत असमतोल दूर करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने नाशिक पूर्व, नाशिकरोड आणि नाशिक पश्चिम विभागातील ४७८ सफाई कर्मचा-यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. सदर कर्मचा-यांच्या नेमणूका आता सिडको, सातपूर आणि पंचवटी विभागात करण्यात आल्या आहेत.
महापालिकेच्या आरोग्य विभागात १८६३ सफाई कामगार कार्यरत आहेत. मात्र, प्रत्यक्षात १४७४ कर्मचारीच साफसफाईची कामे करत होते तर उर्वरित ३८९ कर्मचारी हे कामाच्या सोईने तसेच राजकीय पुढा-यांच्या वरदहस्तामुळे वर्षानुवर्षापासून अन्य विभागात काम करत होते. तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर विविध विभागात काम करणा-या ३८९ कर्मचा-यांना दणका दिला आणि त्यांना मूळ सेवेत जाण्याचे आदेश काढले. दरम्यान, अभिषेक कृष्ण आयुक्त असताना विभागनिहाय सफाई कर्मचा-यांचे समसमान वाटप करावे, अशी मागणी सत्ताधा-यांसह विरोधकांकडून झालेली होती.त्यानुसार, आयुक्तांनी आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांना त्यानुसार कार्यवाहीच्या सूचनाही दिल्या होत्या. परंतु, स्वच्छ सर्वेक्षणाच्या कालावधीत शहराच्या साफसफाईच्या कामाची घडी विस्कटू नये, याकरीता समानवाटपाला ब्रेक बसला होता. मात्र, तुकाराम मुंढे यांनी त्याबाबत तातडीने कार्यवाहीचे आदेश दिल्यानंतर आरोग्याधिका-यांनी नाशिकरोड, नाशिक पूर्व आणि नाशिक पश्चिम याठिकाणी अतिरिक्त असलेल्या ४७८ सफाई कामगारांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित केले आहेत. या सफाई कामगारांच्या नेमणूका संख्येने कमी कर्मचारी असलेल्या सिडको, सातपूर आणि पंचवटी विभागात पाठविण्यात आले आहे.