चुकीचे नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा

By Admin | Updated: September 1, 2015 23:52 IST2015-09-01T23:52:21+5:302015-09-01T23:52:46+5:30

राष्ट्रवादीची मागणी : मुख्यमंत्र्यांनाही धरले जबाबदार

Transfer wrongful executives | चुकीचे नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा

चुकीचे नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीदरम्यान अतिरेकी बंदोबस्त आणि शहरभर बांबंूच्या बॅरिकेडिंगचे नियोजन करणाऱ्या पोलीस आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात याव्यात, प्रसंगी दोषी असल्यास कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे व माजी उपमुख्यमंत्री आ. छगन भुजबळ यांच्यासह नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी तटकरे व भुजबळ यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यातील चुकीच्या नियोजनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह पोलीस व महसूल यंत्रणेतील अधिकाऱ्यांना दोषी धरले. आ. छगन भुजबळ यांनी सांगितले की, सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत असलेल्या सर्वोच्च समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना पहिल्या पर्वणीदरम्यान झालेल्या गोेंधळाबाबत जबाबदारी झटकता येणार नाही. आता पोलीस रमणी आयोगाचा हवाला देऊन नियोजन केल्याचे सांगत असले तरी याबाबत आधीच माहिती का देण्यात आली नाही.
पोलिसांनीही एक आव्हान म्हणून कुंभमेळा पर्वणीचे नियोजन स्वीकारले पाहिजे. अनुभवी असलेल्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना विश्वासात न घेताच हे नियोजन करण्यात आल्याने ते फसले, अशी कोपरखळीही भुजबळ यांनी मारली. यावेळी विरोधी पक्षनेते आ.धनंजय मुंडे यांनी दुष्काळाबाबत शरद पवार यांनी मराठवाड्यात दौरा केल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौरा करीत असल्याची टीका केली, तर मुख्यमंत्र्यांचा मराठवाडा दौरा म्हणजे ‘बैल गेला आणि झोेपा केला’ या प्रकारातील असूनही आता दौरा करण्यापेक्षा प्रत्यक्ष दुष्काळातील नियोजनाच्या उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. संपूर्ण कर्जमाफी, वीज बील माफी, सक्तीची वसुली थांबविणे,सरकारी यंत्रणेमार्फत चारा छावण्या सुरू करणे, या उपाययोजना करण्याची मागणी तटकरे यांनी केली. यावेळी आ.जयंत जाधव, जि.प.अध्यक्ष विजयश्री चुंबळे, आ.हेमंत टकले, शिवाजी चुंबळे, भारती पवार, छबू नागरे, विष्णुपंत म्हैसधुणे, शोभा मगर, प्रेरणा बलकवडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)



४मुख्यमंत्र्यांनी आवाहन करावेसिंहस्थ पर्वणी काळादरम्यान मुंबईहून येणारी वाहतूक थेट भिवंडीहून वळविण्यात आली होती. दुकाने बंद ठेवण्यात आली होती. जगात कुठेही घडत नसेल, ते अमरधामही बंद ठेवण्यात आले. या सर्वांबाबत नाशिककरांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला असून, याबाबत आगामी पर्वणीत सुधारणा न झाल्यास राष्ट्रवादी कॉँग्रेस रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असे आमदार छगन भुजबळ यांनी सांगितले. आता स्वत: मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी सर्व अटी शिथिल करून भाविकांना येण्याचे आवाहन केले पाहिजे.

Web Title: Transfer wrongful executives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.