त्र्यंबक पालिकेच्या कचरा डेपोचा प्रश्न मार्गी
By Admin | Updated: December 2, 2014 01:07 IST2014-12-02T01:06:59+5:302014-12-02T01:07:07+5:30
४ डिसेंबरला मिळणार जागेचा ताबा

त्र्यंबक पालिकेच्या कचरा डेपोचा प्रश्न मार्गी
त्र्यंबकेश्वर : गेल्या अनेक वर्षांपासून गाजत असलेला त्र्यंबक पालिकेचा घनकचरा प्रश्न अखेर सुटला असून, येत्या ४ डिसेंबर रोजी सरकारी मोजणी होऊन पालिकेच्या ताब्यात निश्चित केलेली जागा मिळणार असल्याचे समजते. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून ही जागा ताब्यात मिळत आहे. त्र्यंबक शहराची वाढती लोकसंख्या, येणाऱ्या भाविकांचा दर्शनाचा लोंढा यामुळे नित्यनियमाने १५ टनापर्यंत घनकचरा शहराबाहेर फेकला जातो. तथापि गेल्या सुमारे शतकापासून अस्तित्वात असलेल्या सध्याच्या कचरा डेपो फुल्ल झाला असून, डेपो शहरातील नागरी वस्तीत आला आहे. परिणामी कचरा टाकण्यास जागाच शिल्लक नाही त्यामुळे पर्यायी जागेचा शोध सुरू होता.
२००८मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी पेरियास्वामी चोक्कलिंगम यांनी कोजुळी, ता. त्र्यंबकेश्वर येथील सरकारी जागा गट क्र. ४९ सुमारे तीन हेक्टर जागा (सुमारे ७।। एकर) त्र्यंबक नगरपालिकेला सुपूर्द केली. प्रस्तुत जागा पहिले ग्रुप ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात आहे. प्राथमिक कोर्टकचेरी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली तरीही प्रकरण थेट उच्च न्यायालयापर्यंत गेले. तथापि न्यायालयीन प्रक्रि येनंतर अखेर पालिकेच्या बाजूने कौल दिला. पालिकेने प्रकरण सामंजस्याने घेऊन गावकऱ्यांशी चर्चा करून या भागातील प्रतिष्ठित ग्रामस्थांना घेऊन पुणे येथे घनकचरा प्रकल्पाची माहिती प्रत्यक्ष दाखविली. दरम्यान, प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी नियोजित डेपोची प्रत्यक्ष पाहणी केली. जवळ असलेल्या श्ेतीची दूरवरील जलसाठ्याची पाहणी करून या डेपोपासून कुठलीही अडचण व धोका नाही असा अहवाल दिला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हिरवा कंदील दिला.
सध्याच्या कचऱ्यापासून काय प्रक्रिया करता येईल, याबाबत प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. विशेष म्हणजे जागा ताब्यात घेतल्याबरोबर लगेच कचरा आणून टाकता येईल असे नाही. अगोदर भिंतीचे कंपाउण्ड बांधून जागा स्वच्छ करून नंतरच कचरा टाकता येईल. अर्थात या प्रक्रियेत विलंब लागणार आहे. तसेच गाव ते डेपोची जागा हे बरेच अंतर आहे. त्यामुळे डेपोपासून कोणालाही त्रास होणार नाही असेही सांगण्यात आले. स्थानिक गावकऱ्यांनी पालिकेस सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले.
वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या बंदोबस्तात जागेचा ताबा स्वत: प्रांतधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, पालिकेचे अधिकारी, नगर भूमापन अधिकारी मोजणी करून ताब्यात घेतील. बुधवारी पहिणे व परिसरातील लगतच्या शेतकऱ्यांना येत्या ४ डिसेंबरला सरकारी मोजणीसाठी उपस्थित राहणेबाबत अधीक्षक, नगर भूमापन यांच्या स्वाक्षरीने नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे ते उपस्थित राहतील, असे समजते.