Trail of roads in Bhagur area | भगूर भागातील रस्त्यांची चाळण
भगूर भागातील रस्त्यांची चाळण

भगूर : भगूर शहराशी परिसरातील ग्रामीण भागातील किमान पन्नास खेड्ड्यांचा संपर्क असून, मागील कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भगूर भागातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे विंचुरी दळवी, राहुरी, दोनवाडे, पांढुर्ली रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून, रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न येथील नागरिकांना पडला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने भगूर पांढुर्ली रस्त्याची तत्काळ दुरु स्ती करावी, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
भगूर व परिसरात पांढुर्ली रस्त्यावरून राहुरी, दोन वाडे, विंचुरी दळवी, पांढुर्ली, शिवडा, शेणीत, बेलू, आगसखिंड आदीसह इतरही खेड्ड्यातील नोकरदार वर्ग, शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी प्रवास करत असतात. परंतु आज भगूर ते पांढुर्ली यादरम्यान रस्त्याच्या मधोमध मोठे-मोठे खड्डे पडले असून, रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. यामुळे दिवसा छोटे-मोठे अपघात घडत असून, रात्रीच्या वेळेस जर एखादा मोठा अपघात घडल्यास त्यास जबाबदार कोण राहील, असा सवालही या परिसरातील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ या रस्त्याची दुरु स्ती करावी व रस्त्याच्या कडेला आलेल्या झाडांच्या फांद्या व रस्त्यावर आलेल्या पालापाचोळा यांचीही साफसफाई करावी, अशी मागणी वामन दळवी, प्रकाश दळवी, त्र्यंबक दळवी, राहुरी सरपंच संगीता घुगे, संपत घुगे, ऋषीकेश घुगे, गणेश करंजकर, दिलीप जाधव, श्रावण निकम, मदन गायकवाड, कैलास यादव, अंबादास कस्तुरे, मदन घुगे, अनिल बोडकेसह शेतकऱ्यांनी केली आहे.


Web Title: Trail of roads in Bhagur area
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.