रस्त्यावरच वाहने उभी केल्याने नाशिकरोडला वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:39 IST2018-08-28T00:38:43+5:302018-08-28T00:39:11+5:30
रेजिमेंटल प्लाझा मागील गायकवाड रस्त्यावर दुतर्फा असलेले व्यावसायिक संकुल, गाळे यामुळे दोन्ही बाजूला रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने दिवसभर या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झालेली असते. मनपा व शहर वाहतूक शाखेने या ठिकाणी लक्ष देऊन उपाययोजना करण्याची गरज आहे.

रस्त्यावरच वाहने उभी केल्याने नाशिकरोडला वाहतूक कोंडी
नाशिकरोड : रेजिमेंटल प्लाझा मागील गायकवाड रस्त्यावर दुतर्फा असलेले व्यावसायिक संकुल, गाळे यामुळे दोन्ही बाजूला रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने दिवसभर या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झालेली असते. मनपा व शहर वाहतूक शाखेने या ठिकाणी लक्ष देऊन उपाययोजना करण्याची गरज आहे. रेजिमेंटल प्लाझा मागील गायकवाड मळा रस्त्यावर दुतर्फा व्यावसायिक व रहिवासी संकुले आहेत. काही व्यावसायिक संकुलला पार्किंगची जागाच सोडण्यात आली नाही. तर काही संकुलाची पार्किंगची जागा अपुरी पडत आहे. व्यावसायिक रेजिमेंटल प्लाझा इमारत, गायकवाड मळा रस्त्यावर विविध प्रकारची दुकाने, क्लासेस, दवाखाने असून रहिवासी राहात असल्याने सकाळपासून रात्रीपर्यंत या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. रेजिमेंटल प्लाझाकडून गायकवाड मळा रस्त्याने दत्तमंदिररोड व प्रतीक आर्केड मार्गे नाशिक-पुणे महामार्गावर जाता येते. बिटको ते देवळालीगावपर्यंतच्या महात्मा गांधी रोडवरून दत्तमंदिररोड व तेथून इतरत्र जाण्यासाठी गायकवाड मळा, मुक्तिधाम-सोमाणी उद्यान रस्त्याचा स्थानिक रहिवासी मोठ्या प्रमाणात वापर करतात. वाढलेली लोकसंख्या, वाहनांची संख्या यामुळे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी अत्यंत छोटे पडतात. त्यात पार्किंगची सुविधा नसल्याने वाहनांना रस्त्यावर उभे केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. गायकवाड मळा रस्त्यावरील दुतर्फा असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावरील गाळ्याच्या पुढे मोकळ्या जागेवर रस्त्यापेक्षा उंच सीमेंटचा कोबा अथवा पेव्हर ब्लॉक लावलेले आहेत. त्यामुळे दुकानांत येणारे गिºहाईक ही आपली दुचाकी, चारचाकी गाडी रस्त्यावरच लावतात. अगोदरच रस्ता छोटा असून दुतर्फा रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याने दिवसभर वाहतुकीची कोंडी होत आहे. सोमाणी उद्यान रस्त्यावर दुतर्फा असलेले विक्रेत्यांचे अतिक्रमण, पार्किंगची अपुरी जागा यामुळे तेथेदेखील दिवसभर वाहतुकीची कोंडी होत असते. दंडात्मक कारवाई करून प्रश्न सुटणार नसल्याने मनपा शहर व वाहतूक शाखेने त्या ठिकाणी व्यापारी, व्यावसायिक, डॉक्टर आदींची बैठक घेऊन सर्वसंमतीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
आयुक्तांची घोषणा हवेत
तीन महिन्यांपूर्वी दत्तमंदिररोड येथील मैदानावर झालेल्या ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमामध्ये नागरिकांनी सोमाणी उद्यान व गायकवाड मळा रस्त्यावर अतिक्रमणामुळे होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीची तक्रार केली होती. तसेच सोमाणी उद्यान व गायकवाड मळा रोड (दोन्ही वेगवेगळ्या बाजूने) वन-वे केल्यास वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मार्गी लागेल, अशी सूचना केली होती. यावर मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी शहर वाहतूक शाखेला तत्काळ प्रस्ताव पाठवून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ती घोषणा हवेतच विरली असल्याचे बोलले जात आहे.