कुसुमाग्रज स्मारकासमोर वाहतुकीचा खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:38 IST2021-02-05T05:38:30+5:302021-02-05T05:38:30+5:30
--- जसपालसिंग बिर्दी सायकल ट्रॅकवर अस्वच्छता नाशिक : वडाळागाव चौफुली ते साईनाथनगर सिग्नलपर्यंत साकारण्यात आलेल्या जसपालसिंग बिर्दी सायकल ट्रॅकवर ...

कुसुमाग्रज स्मारकासमोर वाहतुकीचा खोळंबा
---
जसपालसिंग बिर्दी सायकल ट्रॅकवर अस्वच्छता
नाशिक : वडाळागाव चौफुली ते साईनाथनगर सिग्नलपर्यंत साकारण्यात आलेल्या जसपालसिंग बिर्दी सायकल ट्रॅकवर रानगवताचा विळखा अन् ठिकठिकाणी बाकांभोवती कचरा साचल्याने अस्वच्छता पसरली आहे. या सायकलट्रॅकवर नियमितपणे स्वच्छता होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. सायकल ट्रॅकचे सुशोभीकरण करण्याची गरज असून पथदीप बसविण्यात न आल्यामुळे रात्रीच्यावेळी येथे अंधाराचे साम्राज्य असते. सूर्यास्तानंतर सायकलपटुंना येथे फेरफटका मारताना कसरत करावी लागते.
---
गायकवाड सभागृहामागील रस्त्याची दूरवस्था
नाशिक : मुंबईनाका येथून वडाळा रोडला जोडणाऱ्या नासर्डी नदीकाठालगतच्या दादासाहेब गायकवाड सभागृहामागील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. वारंवार तक्रार करूनदेखील केवळ ‘ठिगळ’ लावण्यापलीकडे कुठल्याही प्रकारची दखल महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेतली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ठिकठिकाणी डांबरी ठिगळ लावल्याने रस्ता ओबडधोबड झाला आहे.
----
वडाळा गावात भटक्या श्वानांच्या झुंडी
नाशिक : वडाळा गाव परिसरात मागील काही दिवसापासून भटक्या श्वानांच्या संख्येत वाढ झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांच्या अंगावर धाव घेऊन किरकोळ स्वरुपात जखमी केल्याचीही घटना घडली होती. वडाळा गावातील रझा चौक, झीनतनगर, रामोशीवाडा, गरीब नवाज कॉलनी आदि परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या अधिक आहे. मनपाने तातडीने कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
---
द्वारकेवर सिग्नलचे उल्लंघन
नाशिक : द्वारका चौकात वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी बसविण्यात आलेल्या सिग्नल यंंत्रणेचे बहुतांश वाहनचालकांकडून उल्लंघन केले जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. यामुळे द्वारकेवर अपघातांना निमंत्रण मिळत असून वाहतूक कोंडीही होत आहे. शहर वाहतूक पोलीस चौकात असो किंवा नसो द्वारकेवर एक तरी बाजूने वाहनचालकांकडून सिग्नलचे सर्रासपणे उल्लंघन होतानाचे चित्र पहावयास मिळते.
---