नाशिक-पुणे महामार्गावर पुन्हा ट्रॅफिक जाम; रुग्णवाहिका अडकली, २ तासांपासून वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 10:14 IST2025-05-02T10:13:16+5:302025-05-02T10:14:07+5:30
काँक्रेटीकरणाचे काम ; नियोजनाचा अभाव, आंबी खालसा फाटा, घारगाव, चंदनापुरी घाट यादरम्यान दररोज महामार्गावर वाहतूक ठप्प होत आहे.

नाशिक-पुणे महामार्गावर पुन्हा ट्रॅफिक जाम; रुग्णवाहिका अडकली, २ तासांपासून वाहतूक ठप्प
घारगाव - नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात शुक्रवार (दि.२) आज सकाळी ८ वाजेपासून पुन्हा वाहतूक कोंडी झाली आहे. २ तासांपासून नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. काल गुरुवारी सुमारे पाच तास ट्रॅफिक जाम झाले होते. महामार्ग सिमेंट काँक्रेटीकरणाचे काम सुरु असून महामार्ग प्रशासनाने वाहतूक सुरळीत राहावी यासाठी योग्य नियोजन केले नसल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
आंबी खालसा फाटा, घारगाव, चंदनापुरी घाट यादरम्यान दररोज महामार्गावर वाहतूक ठप्प होत आहे. काँक्रेटीकरणाचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे या कामाचा फटका वाहनधारकांना बसत असून वाहनचालक त्रस्त झाले आहेत. येथील व्यावसायिकांनाही आर्थिक फटका बसला आहे. काँक्रेटीकरणाचे काम तात्काळ सुरु करावे अन्यथा रास्तारोको आंदोलन करणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गुरुवारी सकाळपासून दीड किलोमीटरवर वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. महामार्ग सिमेंट काँक्रेटीकरणाचे काम सुरु असल्याने मुळा नदीवरील पुलावर पुणे लेनवर सध्या काम सुरु आहे. मात्र, काही दिवसांपासून काम बंद अवस्थेत आहे. वाहतूक नाशिक लेनने वळविण्यात आली आहे.
एकेरी वाहतूक व अवजड वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. वाहतुकीचे योग्य नियोजन नसल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. या गोंधळावर महामार्ग प्रशासनासह वाहतूक पोलीसांचेकडून नियंत्रण ठेवण्यात आलेले नाही. कोंडीतून मार्ग काढण्यासाठी चालक मिळेल त्या जागेतून वाहने पुढे नेत असल्याने ही कोंडी अधिकच गुंतागुंतीची होत आहे.
वाहतूक कोंडीत अडकतात रुग्णवाहिका
पुणे- नाशिक दोनही दिशेने जाणाऱ्या रुग्णवाहिका या वाहतूक कोंडीत अडकतात. वाहनांच्या रांगेने महामार्गावरच्या कोंडीत खोळंबून राहणाऱ्या रुग्णवाहिकांमधील रुग्णांचे हाल होतातच. मात्र, त्यांच्या नातेवाईकांनाही नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.