सिग्नल यंत्रणा बंद असल्याने वाहतुकीचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:26 IST2021-03-13T04:26:03+5:302021-03-13T04:26:03+5:30
नाशिकरोड : शहरातील सिग्नल दुरुस्ती व देखभालीचे काम मनपा विद्युत विभागाकडून पोलीस प्रशासनाने स्वतःकडे घेतल्याने विविध अडचणी निर्माण झाल्या ...

सिग्नल यंत्रणा बंद असल्याने वाहतुकीचा बोजवारा
नाशिकरोड : शहरातील सिग्नल दुरुस्ती व देखभालीचे काम मनपा विद्युत विभागाकडून पोलीस प्रशासनाने स्वतःकडे घेतल्याने विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत. गेल्या पाच दिवसांपासून नाशिक - पुणे महामार्गावरील फेम चित्रपटगृहाजवळील सिग्नल यंत्रणा बंद असल्याने दिवसभर वाहतुकीची कोंडी होऊन वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे. नाशिक शहरात पहिल्यापासून सिग्नल बसविणे, त्याची दुरुस्ती व देखभाल करण्याचे काम मनपा विद्युत विभागाकडून गेल्या २५ वर्षांपासून केले जात होते. मात्र, दोन-तीन महिन्यांपूर्वी पोलीस प्रशासनाने मनपा विद्युत विभागाकडे सिग्नल दुरुस्ती व देखभालीचे असलेले काम स्वतःकडे घेतले आहे. पोलीस प्रशासनाकडे आजघडीला सिग्नल देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी इलेक्ट्रिशियन नसल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. नाशिक - पुणे महामार्गावरील फेम चित्रपटगृहाजवळील सिग्नल यंत्रणा गेल्या पाच दिवसांपासून नादुरुस्त होऊन बंद पडली आहे. या महामार्गावर पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीची मोठी वर्दळ असते. सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने वाहतुकीची सतत कोंडी होत असून, वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे. यामुळे छोटे-मोठे अपघात व त्यातून वादविवादाच्या घटना घडत आहेत. वाहतूक पोलिसांना दिवसभर तळपत्या उन्हात भर चौकात उभे राहून वाहतुकीचे नियोजन करणे शारीरिकदृष्ट्या अवघड झाले आहे. सिग्नल यंत्रणा बंद असल्यामुळे कायदा व नियम न पाळणाऱ्या वाहनधारकांचे फावत आहे. याबरोबरच जेल रोड, इंगळेनगर चौफुली, सातपूर पपया नर्सरी, जुना गंगापूर नाका, शरणपूर रोड, एचडीएफसी चौक सिग्नल येथील काही सिग्नल नादुरुस्त झाल्याने वाहनचालकांचा गोंधळून मोठी अडचण निर्माण झाली आहे. यामुळे वाहतूक पोलीस त्रस्त झाले आहेत. तसेच शहरातील काही सिग्नलवर बसवलेल्या टाईमरचे टाईमिंग चुकल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे. पोलीस प्रशासनाने तत्काळ इलेक्ट्रिशियन नेमून शहरातील सर्व सिग्नल व्यवस्थित कार्यरत करावेत किंवा पुन्हा मनपा विद्युत विभागाकडे पूर्वीप्रमाणे शहरातील सिग्नल यंत्रणेचे दुरुस्ती व देखभालीचे काम सुपूर्द करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
(फोटो ११ सिग्नल)