नांदूरशिंगोटे येथील बाजारात १३ आठवड्यांपासून व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:29 IST2020-06-16T21:48:10+5:302020-06-17T00:29:52+5:30
नांदूरशिंगोटे : कोरोनामुळे आठवडे बाजार बंद झाल्याने ग्रामपंचायतींना लाखो रुपयांच्या करवसुलीवर पाणी सोडावे लागले आहे. तालुक्यातील दहा ते बारा ग्रामपंचायतींच्या हद्दीतील आठवडे बाजार १३ आठवड्यांपासून ठप्प असल्याने त्याचा परिणाम बाजारपेठ व ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर झाला आहे.

नांदूरशिंगोटे येथील बाजारात १३ आठवड्यांपासून व्यवहार ठप्प
नांदूरशिंगोटे : कोरोनामुळे आठवडे बाजार बंद झाल्याने ग्रामपंचायतींना लाखो रुपयांच्या करवसुलीवर पाणी सोडावे लागले आहे. तालुक्यातील दहा ते बारा ग्रामपंचायतींच्या हद्दीतील आठवडे बाजार १३ आठवड्यांपासून ठप्प असल्याने त्याचा परिणाम बाजारपेठ व ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर झाला आहे. देशात व राज्यात गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये गर्दी होणारी सर्व ठिकाणे बंद करण्यात
आली आहेत. गावोगावी भरणारे आठवडे बाजार पहिल्या लॉकडाऊनपासून बंद करण्यात आले आहेत.
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव, दापूर, चास, नांदूरशिंगोटे, गुळवंच, पंचाळे, वावी, पाथरे बुद्रुक, वडांगळी, शहा, नायगाव, सोमठाणे आदी बारा गावांत आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी बाजार भरत असतो. आठवडे बाजाराच्या माध्यमातून काही ग्रामपंचायतींना लिलावाच्या माध्यमातून करवसुली करतात. या माध्यमातून लाखो रुपयांचा महसूल ग्रामपंचायतींना मिळतो.
या निधीच्या माध्यमातून विकासाची कामे ग्रामपंचायतींना करता येतात. मात्र लॉकडाऊनमुळे आठवडे बाजार भरले नाही. त्यामुळे करवसुलीवर ग्रामपंचायतीला पाणी सोडावे लागले.
------------------
स्थानिक व्यावसायिकांना फटका
नांदूरशिंगोटेचा दर शुक्र वारी आठवडे बाजार असतो. तसेच त्याच दिवशी येथील उपबाजारात कांद्याचा व धान्य, भुसार मालाची खरेदी-विक्र ी केली जाते. परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने पंधरा ते वीस गावांचा येथे बाजाराच्या निमित्ताने संपर्क असतो. येथील आठवडे बाजारात दर शुक्र वारी लाखो रु पयांची उलाढाल होते. परिसरातील ग्राहक येथे बाजारासाठी येत असतात; पंरतु गेल्या तीन महिन्यांपासून आठवडे बाजार बंद असल्याने त्याचा फटका स्थानिक व्यावसायिकांनाही बसला आहे. अद्यापही छोटे-मोठे दुकाने बंद असल्याने बाजारपेठेत गर्दी कमी आहे.
नांदूरशिंगोटे येथील आठवडे बाजाराचा लिलाव दरवर्षी चढ्या दराने जात होता. दरवर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लिलाव केला जात होता. परंतु यावर्षी कोरोनामुळे लिलाव करण्याची वेळच आली नाही. लॉकडाऊनमुळे आठवडे बाजार बंद झाला. परंतु गावातील काही आस्थापना बंद असल्याने त्याच्या पट्ट्या येणे बंद झाले आहे. मध्यंतरी लोकांना रोजगार नसल्याने घर व पाणीपट्टी वसुली होत नसल्याचे चित्र आहे.