Traders' agitation today due to smart road | रखडलेल्या स्मार्ट रोडमुळे आज व्यापाऱ्यांचे आंदोलन
रखडलेल्या स्मार्ट रोडमुळे आज व्यापाऱ्यांचे आंदोलन

ठळक मुद्देचौकांचे काम संथ : दोन तास व्यवहार ठेवणार बंद

नाशिक : आधीच दीड-दोन वर्षांपासून स्मार्ट रोडचे काम रखडलेले असतानाच सीबीएस आणि मेहेर चौक बंद करण्यात आल्याने या दोन्ही व्यापारपेठांमधील व्यवसायच ठप्प झाला आहे. ऐन सणासुदीत ही परिस्थिती उद्भवल्याने सोमवारी (दि.१४) या दोन्ही मार्गांवरील व्यापारी दुपारी दोन तास दुकाने बंद ठेवून महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीचा निषेध नोंदवणार आहेत.
त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ या अवघ्या एक किलोमीटर रस्त्याचे पथदर्शी स्मार्टरोड म्हणून स्मार्ट सिटी कंपनीने काम सुरू केले आहे, परंतु दोन वर्षांपासून हे काम रखडलेले असून, त्यामुळे नागरिक, विद्यार्थी, वकील आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. आता रस्ता कसातरी पूर्ण करण्यात आला असून, त्याच्या दर्जाविषयी वाद असल्याने कंपनीने आयुक्त राधाकृष्ण गमे यांना त्यांची रायडिंग क्वॉलिटी तपासण्याचे आदेश दिले आहेत. मात्र हा गोंधळ सुरू असतानाच उर्वरित काम वेळेत पूर्ण करण्याच्या घाईपोटी सीबीएस आणि मेहेर चौक खोदण्यात आले आहेत. अशोकस्तंभ चौकदेखील खोदण्यात येणार होता मात्र स्थानिक व्यापाºयांनी विरोध केला. त्यामुळे पोलिसांनीदेखील खोदकाम करण्यास परवानगी दिली नाही.
शहरातील महात्मा गांधीरोड, शिवाजीरोड हे दोन प्रमुख रस्ते असून, दोन्ही ठिकाणी व्यापारी व्यावसायिकांची दुकाने आहेत. ऐन सणासुदीत मेहेर आणि सीबीएस चौक बंद करण्यात आल्याने त्यांच्याकडे येणाºया ग्राहकांची संख्या रोडावली आहे. गेल्या २२ सप्टेंबर रोजी खोदकाम सुरू करण्यात आल्यानंतर नवरात्र आणि दसºयाच्या मुहूर्तावर होणारी खरेदी आणि सर्व व्यवहार रखडले. आता आठ दिवसांवर दिवाळी असून, या कालावधीत मोठी उलाढाल होण्याची शक्यता असताना तीदेखील दुरावली आहे.
व्यापारी त्रस्त
या मार्गावरील सर्व रस्ते पूर्वीप्रमाणेच खुले करावे, या मागणीसाठी तसेच रखडलेल्या कामाचा निषेध करण्यासाठी सोमवारी (दि.१४) व्यापारी व्यावसायिक तसेच सर्व कार्यालये दुपारी तीन ते पाच या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर दखल घेतली गेली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या व्यावसायिकांनी दिला आहे.
व्यवसाय ठप्प : आयुक्तांना देणार निवेदन
सध्या आर्थिक मंदीचे वातावरण असल्याने मुळात व्यवसायावर मोठा प्रतिकूल परिणाम झाला असून, त्यातून सावरण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मात्र व्यवसाय ठप्प होत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे.

Web Title: Traders' agitation today due to smart road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.