तौक्ते चक्रीवादळाची मदत दीड महिन्यातच प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:17 IST2021-07-07T04:17:55+5:302021-07-07T04:17:55+5:30

नाशिक : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अवघ्या दीड महिन्यातच नुकसानभरपाई मिळाली आहे. संबंधित ...

Touchte hurricane relief received within a month and a half | तौक्ते चक्रीवादळाची मदत दीड महिन्यातच प्राप्त

तौक्ते चक्रीवादळाची मदत दीड महिन्यातच प्राप्त

नाशिक : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अवघ्या दीड महिन्यातच नुकसानभरपाई मिळाली आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्गदेखील झाली असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्याला सुमारे नऊ कोटी ३७ लाखांची मदत शासनाने दिली आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील ८१२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करून शासनाकडे मदतीसाठीचा प्रस्ताव सादर केला होता. १५ ते १७ मे या कालावधीत कोकण किनारपट्टीवर अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने

जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील ८१२ हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले होते. सर्वाधिक फटका पेठ, सुरगाणा तालुक्यांना बसला. यामध्ये फळबागांना सर्वाधिक फटका बसला होता, तर ७९८ हेक्टरवरील आंबा पिकाचे नुकसान झाले तसेच २४२ गावे बाधित झाली होती. सुरगाणा तालुक्यातील १३० गावे बाधित झाली, तर २५४१ शेतक‍ऱ्यांचे ५८१ हेक्टरवरील, तर पेठ तालुक्यातील ९३ गावे बाधित झाली. १४८० शेतकऱ्यांच्या २०५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. देवळा, दिंडोरी, नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी, सिन्नर तालुक्यांनाही काही प्रमाणात या वादळाचा फटका बसला.

नाशिक, सटाणा, चांदवड, दिंडोरी, इगतपुरी, कळवण, निफाड, पेठ, सिन्नर, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, देवळा या तालुक्यांमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मागीलवर्षी जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसल्याने मोठे नुकसान झाले होते. मात्र, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची भरपाई मिळण्यास चार ते पाच महिन्यांचा विलंब झाला होता. तौक्ते चक्रीवादळाची मात्र शेतकऱ्यांना दीड महिन्यात मदत प्राप्त झाली आहे.

--इन्पो--

चार हजार शेतकऱ्यांचे नुकसान

तौक्ते चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. सुमारे चार हजार ९६ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. पंचनामे पूर्ण करण्यात आल्यानंतर शासनाकडे मदतीसाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. सुमारे ९ कोटी ३७ लाखांचा हा प्रस्ताव अवघ्या दीड महिन्यात मंजूर होऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात देखील आले. शेतीपिकांचे नुकसान तसेच घर दुरुस्तीसाठी असलेल्या नियमाप्रमाणे शासनाने मदत देण्यात आलेली आहे.

Web Title: Touchte hurricane relief received within a month and a half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.