भाजपात उमेदवारीवरून आज पुन्हा घमासान
By Admin | Updated: February 1, 2017 00:47 IST2017-02-01T00:46:53+5:302017-02-01T00:47:13+5:30
प्रतिष्ठेचा प्रश्न : पहिली यादी घोषित होणार

भाजपात उमेदवारीवरून आज पुन्हा घमासान
नाशिक : पक्षाचे आमदार आणि काही प्रदेश पदाधिकाऱ्यांनी केलेल्या प्रतिष्ठेच्या प्रश्नामुळे भाजपाची यादी रखडली. त्यातच पालकमंत्री गिरीश महाजन यांना जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जळगावला जावे लागल्याने या पक्षाची उमेदवारी रखडली असून, अद्याप उमेदवारच घोषित करण्यात आले नाही. त्यामुळे माघी गणेश जयंतीच्या दिवशी गणराय कोणालाच पावला नाही. आता बुधवारी महाजन यांच्या उपस्थितीत पुन्हा सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक होत असून, त्या उमेदवारीवरून घमासान रंगण्याची शक्यता आहे. भाजपाच्या वतीने बुधवारीच पहिली यादी जाहीर केली जाणार असल्याचे पक्षातर्फे अधिकृतरीत्या कळविण्यात आले आहे. भाजपाच्या उमेदवारीसाठी सुमारे सातशे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. त्यानंतर २७ तारखेला पहिली यादी घोषित होईल, असे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी सांगितले होते, मात्र अद्याप यादी घोषित नाही.
यादीसंदर्भात सोमवारी रात्री पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत एक बैठक महाजन यांच्या निवासस्थानी म्हणजेच सिटी सेंटर मॉल परिसरातील एका ठिकाणी घेण्यात आली. त्यात सर्वच पदाधिकारी आपापल्या समर्थकांसाठी अडून राहिल्याने कोणताही निर्णय होऊ शकला नाही. काही ठिकाणी प्रवेश घेणाऱ्या विद्यमान नगरसेवक किंवा अन्य दावेदारांना शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप तसेच अन्य काही आमदारांनी शब्द दिले असून, अशावेळी उमेदवारीसाठी स्पर्धा वाढल्याचे वृत्त आहे. पंचवटीतील प्रभागात प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांच्या मातोश्री भिकूबाई बागुल उमेदवारी करीत असून, त्या प्रभागात दामोदर मानकर यांना उमेदवारीसाठी सानप यांचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येते. मात्र मखमलाबाद येथील ग्रामस्थांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांना भेट देऊन गावातील वेगळा उमेदवार देण्याची मागणी केली आहे. त्यातून पेच निर्माण झाला आहे. पंचवटीत उत्तम उगले आणि जगदीश पाटील यांच्यातही असाच पेच निर्माण झाला आहे. सिडको- सातपूर विभागात तर आमदार सीमा हिरे आणि आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी आपापल्या कार्यकर्त्यांसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न केला आहे. त्यामुळे या दोन विभागांमध्ये अधिकच गोंधळ आहे. पश्चिम प्रभागात प्रभाग १२ मध्ये गिरीश पालवे, सुरेश पाटील आणि हेमंत धात्रक यांचा तिढा सुटलेला नाही, तर प्रभाग १३ मध्ये पक्षाकडे राखीव गटात सक्षम उमेदवार नाही. प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार वसंत गीते आणि सुनील बागुल यांच्या समवेत अनेकांनी पक्षप्रवेश केला असून, तेदेखील अशाच काही जागांसाठी प्रयत्न करीत आहे. प्र्रभाग क्रमांक सातमध्ये माजी नगरसेवक मधुकर हिंगमिरे व आमदार सीमा हिरे यांचे दीर योगेश हिरे तसेच महिला कार्यकर्त्यांत रस्सीखेच सुरू आहे. सातपूरच्या प्रभाग क्रमांक ८ मध्ये पक्षामध्ये नवा आणि जुना असा वाद सुरू आहे. प्रभाग ३१ मध्ये महिला उमेदवार कोण, यावरून आमदारव्दयींमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. मंगळवारी पालकमंत्री गिरीश महाजन हे आपल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीचे उमेदवार ठरविण्यासाठी गेल्याने इच्छुकांचा मंगळवारचा दिवस वाया गेला आता. आता बुधवारी महाजन नाशिकमध्ये येणार असून त्यांच्या उपस्थितीत सहमती केली जाणार आहे. (प्रतिनिधी)