आज महासभा : गटनेत्यांकडून अद्याप नावे नाहीत
By Admin | Updated: August 17, 2015 01:18 IST2015-08-17T00:47:59+5:302015-08-17T01:18:51+5:30
महिला बालकल्याण समिती; नियुक्तीबाबत अनुत्साह

आज महासभा : गटनेत्यांकडून अद्याप नावे नाहीत
नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर नऊ सदस्यांची निवड सोमवारी (दि.१७) होणाऱ्या महासभेत केली जाणार आहे; परंतु अद्याप गटनेत्यांकडून आपापल्या पक्षाच्या सदस्यांची नावे महापौरांकडे गेलेली नसल्याने समितीवर जाण्याबाबत एकूणच अनुत्साह दिसून येत आहे. दरम्यान, सोमवारी होणारी महासभा माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहून तहकूब केली जाण्याची शक्यता असल्याने समिती सदस्यांची नियुक्तीही लांबणार आहे.
महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या नऊ सदस्यांची नियुक्ती सोमवारी महासभेत महापौरांकडून केली जाणार आहे. त्यासाठी महापौरांनी शनिवारी गटनेत्यांची बैठक बोलाविली; परंतु नंतर ती रद्द झाली. समितीवर मनसे - ३, राष्ट्रवादी - २, शिवसेना - २, भाजपा - १ आणि कॉँग्रेस - १ असे पक्षीय बलाबल आहे. महिला व बालकल्याण समितीमार्फत ४१९ अंगणवाड्या चालविल्या जातात आणि अंगणवाडीतील बालकांना सकस आहार पुरविण्यासाठी मनपाच्या अंदाजपत्रकात तरतूद केली जाते. याशिवाय महिला व मुलींना स्वयंरोजगारासाठी विविध प्रकारची प्रशिक्षणे दिली जातात. महिला व बालकांच्या योजनांसाठी अंदाजपत्रकात तरतूद केलेल्या वार्षिक महसुली उत्पन्नातून बांधील खर्च वजा जाता उर्वरित रकमेच्या ५ टक्के निधी राखून ठेवला जातो; परंतु गेल्या काही वर्षांपासून निधीअभावी समितीची परवड होऊ लागल्याने आणि समिती केवळ कागदावरच उरल्याने समितीवर जाण्यासाठी महिला सदस्य अनुत्सुक असतात. समितीच्या सभापतींना गाडी व दालन उपलब्ध होत असल्याने अनेकांना केवळ सभापतिपद भूषविण्यातच रस असतो. त्यातच गेल्या दोन-तीन वर्षांत समितीच्या सभांमध्ये विषयपत्रिकेवर विषयच येत नसल्याने कामकाज थंडावलेले आहे.
रविवारी सायंकाळपर्यंत महापौरांकडे गटनेत्यांनी आपल्या पक्षाच्या सदस्यांची नावे सुचविलेली नव्हती. महासभा तहकूबच होणार असल्याने वरिष्ठांशी विचारविनिमय करून नंतर नावे पाठविली जातील, अशी भूमिका गटनेत्यांनी घेतली आहे. (प्रतिनिधी)