Time of starvation on lawns drivers | लॉन्सचालकांवर उपासमारीची वेळ

लॉन्सचालकांवर उपासमारीची वेळ

नाशिक : कोरोना संसर्गामुळे लॉकडाउनमध्येच सर्व विवाह मुहूर्त अडकल्याने यंदा मंगल कार्यालये आणि लॉन्समध्ये सनई-चौघडे वाजलेच नाहीत. अनेक ठिकाणी सोसायटीच्या जागेत आणि घराच्या परिसरात विवाह सोहळ्यांना प्रशासन परवानगी देते, परंतु तेथे कोणत्याही प्रकारे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही.
प्रशासनाचे चुकीचे धोरण मंगल कार्यालये आणि लॉन्सचालकांच्या जिवावर उठले आहे. या मुख्य व्यावसायिकांबरोबरच त्यावर आधारित व्यावसायिकांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. यंदा ऐन विवाह सोहळ्यांच्या हंगामात कोरोनाचे संकट ओढावल्याने विवाह सोहळे रद्द झाले आहेत. गेल्या ९० दिवसांपासून मंगल कार्यालये, लॉन्स बंद आहेत. अगोदरचे सोहळे रद्द झाल्याने कोणतेही शुभ सोहळे गेल्या ७५ दिवसांत झालेले नाही. पुढील काळासाठीदेखील नोंदणी झालेली नाही. त्यामुळे या व्यावसायिकांवर अवलंबून असलेले केटरर्स, डेकोरेटर्स, फुलकाम करणारे, घोडेवाले, बँडवाले, व्हिडीओ आणि फोटोग्राफर अशा सर्वांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. मंगल कार्यालये आणि लॉन्सचालकांना तर कर्जबाजारी होऊन आणखी देखभाल दुरुस्ती, नूतनीकरण आणि कर्मचारी वर्ग सांभाळत आहेत. याशिवाय घरपट्टी व इतर कर, पाणीपट्टी, विजेचे बिलदेखील भरावे लागत आहे.
विविध प्रकारच्या अटी-शर्तींच्या आधारे लॉन्स व मंगल कार्यालयांत सोहळ्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी संघटनेचे सरचिटणीस सुनील चोपडा, कार्याध्यक्ष संदीप काकडे तसेच विक्रांत मते, शंकरराव पिंगळे, समाधान जेजूरकर, अनिल
सोमवंशी, जितेंद्र राका, उत्तमराव गाढवे, योगेश खैरनार, देवदत्त जोशी, पंकज पाटील, केशवराव डिंगोरे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Web Title: Time of starvation on lawns drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.