कर्जमाफीवर वेळकाढूपणाचे धोरण
By Admin | Updated: April 30, 2017 01:13 IST2017-04-30T01:13:29+5:302017-04-30T01:13:38+5:30
सिन्नर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या धोरणावर मुख्यमंत्री वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारत असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

कर्जमाफीवर वेळकाढूपणाचे धोरण
सिन्नर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या धोरणावर मुख्यमंत्री वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारत असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
सिन्नर येथे शुक्रवारी सायंकाळी द बारामती सहकारी बॅँकेच्या शाखा उद्घटनप्रसंगी ते बोलत होते. आमदार राजाभाऊ वाजे अध्यक्षस्थानी होते. विधानसभेतील १६५ आमदारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली आहे. मात्र ‘वेळ आल्यावर पाहू’ असे म्हणत मुख्यमंत्री वेळकाढूपणा करीत असल्याचे पवार म्हणाले.
सिन्नरकरांनी यापूर्वी अनेक प्रकल्पांसाठी जमिनी दिल्या आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्गासाठी पुन्हा त्यांच्यावर जबरदस्ती होऊ नये. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग बनविण्यापेक्षा आहे जुना मुंबई-नागपूर महामार्ग आठपदरी करण्याचा सल्ला पवार यांनी दिला. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे नाव बिनीच्या जिल्हा बॅँकांमध्ये घेतले जात होते. मात्र आज जिल्हा बॅँकेची काय अवस्था झाली आहे असा प्रश्न पवार यांनी केला. नाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळात सर्वपक्षीय रथी-महारथींचा समावेश आहे. सर्वपक्षीय नेत्यांच्या ताब्यात जिल्हा बॅँक असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे मत पवार यांनी यावेळी व्यक्त केले. पीककर्जाच्या बाबतीत तर अतिशय अवघड परिस्थिती बनली आहे. जिल्हा बॅँकेच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच विविध कार्यकारी सोसायट्यांचे सभासद शेतकरी त्यास काही प्रमाणात जबाबदार आहेत. चुकीच्या लोकांना सोसायटीच्या संचालकांमध्ये निवडून दिल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची टीका केली. (वार्ताहर)