राजकारण्यांना यंदा रडवणार कांदा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 15:13 IST2018-08-16T15:12:01+5:302018-08-16T15:13:43+5:30
नाशिक जिल्ह्यातील चांदवड, येवला, नांदगाव, निफाड, सिन्नर, मालेगाव, देवळा या कमी पाऊस पडणा-या तालुक्यांमध्ये जुलै, आॅगष्ट महिन्यात पडणा-या पावसाच्या भरवश्यावर पोळ कांद्याची लागवड केली जाते. साधारणत: तीन महिन्यात सदरचा कांदा बाजारात येतो, तो पर्यंत उन्हाळ कांद्याची सद्दी संपलेली असते. म्हणजेच पोळ कांदा बाजारात आल्यावर बाजारपेठेत कांद्याचे दर स्थिर राहतात.

राजकारण्यांना यंदा रडवणार कांदा !
नाशिक : जुलै व आॅगष्टच्या मध्यान्हापर्यंत पावसाने ओढ दिल्यामुळे याच पावसाच्या भरवश्यावर पोळ कांद्याची लागवड करणाऱ्या शेतक-यांच्या तोंडचे पाणी पळण्याबरोबरच पोळचे घटणारे उत्पादन व उन्हाळ कांद्याची कोणीतीही शाश्वती सध्या तरी देता येत नसल्यामुळे पुढच्या वर्षी ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात संभाव्य भाववाढीने कांदा राजकारण्यांना चांगलाच रडवणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
नाशिक जिल्ह्यातील चांदवड, येवला, नांदगाव, निफाड, सिन्नर, मालेगाव, देवळा या कमी पाऊस पडणा-या तालुक्यांमध्ये जुलै, आॅगष्ट महिन्यात पडणा-या पावसाच्या भरवश्यावर पोळ कांद्याची लागवड केली जाते. साधारणत: तीन महिन्यात सदरचा कांदा बाजारात येतो, तो पर्यंत उन्हाळ कांद्याची सद्दी संपलेली असते. म्हणजेच पोळ कांदा बाजारात आल्यावर बाजारपेठेत कांद्याचे दर स्थिर राहतात. परंतु यंदा पोळ कांदा पिकविणा-या तालुक्यांकडे पावसाने वक्रदृष्टी केली असून, पावसाच्या पाळ्यावर नजर ठेवून कांदा लागवड करणा-या शेतक-यांनी जी काही पोळ कांद्याची लागवड केली आहे, त्यांना कांदा टिकविण्यासाठी पावसाची गरज आहे तर ज्यांना चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे त्यांनी अद्याप लागवड केलेली नाही. त्यामुळे पोळ कांद्याचे पीक पावसाअभावी धोक्यात आले आहे, त्याच बरोबर जून ते सप्टेंबर दरम्यान पडणाºया पावसावर भिस्त ठेवून आॅक्टोंबर, नोव्हेंबरमध्ये उन्हाळ कांद्याची लागवडीवर देखील सध्याच्या अपुºया पावसाचा परिणाम होणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. उन्हाळ कांदा साधारणत: फेब्रुवारी ते मार्च दरम्यान बाजारात येतो, तो पर्यत साठवणुकीयोग्य नसलेला पोळ कांदा बाजारातून संपुष्टात आलेला असतो. त्यामुळे येणा-या आठ ते नऊ महिन्यात ग्राहकांच्या चवीची जबाबदारी पेलणाºया उन्हाळ कांद्याच्याही लागवडीवर आता परिणाम होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
कांद्याची दरवाढ वा कांद्याचे कोसळलेल्या भावाचा बाजारपेठेवर ज्या पद्धतीने परिणाम होतो तसाच परिणाम भारतीय राजकारणावरही झाल्याची आजवरची अनेक उदाहरणे असून, पोळ कांद्याचे घटणारे उत्पादन व उन्हाळ कांद्याची कोणतीही शाश्वती सद्या दिसत नसल्याने ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कांद्याचा तुटवडा व वाढलेले दर यावरच विरोधकांकडून भर दिला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वीच राजकारण्यांना कांदा रडवणार असे चित्र दिसू लागले आहे.